एक गणेशमूर्ती, एक वृक्षारोपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई महापालिकेबरोबर पर्यावरणरक्षणासाठी मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रीन अंब्रेला या संस्थांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या एक गणेशमूर्ती, एक वृक्षारोपण या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत मुंबईतील 583 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यासाठी संस्थांकडे नोंदणी केली असून याची संख्या 1 हजाराच्या पुढे नेण्याचा संकल्प उपक्रमाचे प्रमुख नगरसेवक अरविंद भोसले यांनी केला आहे.

मुंबईत मोठया प्रमाणात वृक्षसंपदा आहे आणि त्याची काळजी सक्षमपणे मुंबई महापालिका घेत आहे. यात देशी वृक्षांचे प्रमाण वाढले तर जैवविविधता वाढण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक गणेशमूर्ती, एक वृक्षारोपण हा उपक्रम राबवला जात आहे.

यात नोंदणी केलेल्या मंडळांना चार फुटांहून जास्त उंचीचे देशा झाडांचे रोपटे गणेशोत्सवानंतर दिले जाणार आहे. वृक्षारोपण मंडळे करणार असून या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेनेही वृक्षसंवर्धनात योगदान देत प्रत्येक मंडळाला वृक्ष भेट द्यावा, अशी ठरावाची सूचना अरविंद भोसले यांनी पालिका सभागृहात मांडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या