धरणे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना अधिकाऱ्यांकडून शिवीगाळ

1153

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने धरणे आंदोलन केले होते. दुपारी चार वाजता मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून शासनापर्यंत तुमच्या मागण्या पोहचवण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी बाहेर थांबलेले शिक्षक शिष्टमंडळाची वाट बघत असताना त्याठिकाणी गोपनीय विभागाचे लहासे या कर्मचाऱ्यांनी महिला शिक्षिका व शिक्षकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून आंदोलक शिक्षकांचा अपमान केल्याची घटना घडली आहे. आपल्या मागण्यांसाठी आणि समस्या मांडण्यासाठी शांततेने धरणे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना एका अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याने संताप व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी शिष्टमंडळाशी चर्चा करत असताना अशाप्रकारे शिक्षकांना शिवीगाळ करून त्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध करण्यात येत आहे. शिक्षकांची कृती समिती शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व मंत्रालयात करणार आहे. तसेच शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही संघटना करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या