चोरीच्या संशयावरून तिघांना मारहाण; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केज तालुक्यातील ऊत्रेश्वर पिंपरी येथे चोरीच्या संशयावरून तिघांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथे घडली आहे. या घटनेनंतर मृतदेह ट्रॅक्टरने गावापासून दूर नेले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

या बाबत मृताचे सासरे अशोक भिमराव शिंदे (रा. कोठाळवाडी हनुमान वस्ती, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांचा जावई शिवाजी नामदेव काळे, मुलगा दीपक अशोक शिंदे व आकाश बापू काळे हे आरणगावकडून काळेगाव हनुमंत पिंपरीमार्गे त्यांच्या मोटारसायकलने गावाकडे जात असताना रात्री 12.30 सुमारास आरणगावच्या पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी पुलावरून गाडी घातली. गाडीत पाणी गेल्यामुळे गाडी बंद पडली. मात्र, प्रसंगावधान राखून ते गाडीवरून खाली उतरले व त्यांनी गाडी ढकलीत चालले. ते हनुमंत पिंपरी येथे आले असताना चोर समजून जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात शिवाजी नामदेव काळे याचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला. तर दीपक अशोक शिंदे आणि आकाश बापू काळे हे जखमी झाले. शिवाजी नामदेव काळे याचा मृत्यू होताच जमावाने त्यांना एका ट्रॅक्टरने बोरगाव चौका रस्त्याच्या कडेला नेऊन टाकून दिले. त्यानंतर जखमी दीपक शिंदे व आकाश काळे हे भीतीने गावाकडे पायी जायला निघाले. मात्र, त्यांचा सकाळपर्यंत तपास लागला नसल्याची माहिती आहे.

याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवण्यात आला आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या शिवाजी काळे याच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी व आई वडील असा परिवार आहे.