गोव्यातील हरमलमध्ये रशियन पर्यटक बुडाला

570

जीवरक्षकांच्या संपामुळे गेल्या काही दिवसात गोव्यात सुमारे 14 पर्यटकांचा बुडून मृत्यु झाला आहे. मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यानी तातडीने यात हस्तक्षेप करावा. जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घेत संपावर तोडगा काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. हरमल किनाऱ्यावर रविवारी एका रशियन पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कामत यांनी ही मागणी ट्वीट करून केली आहे. यावर तातडीने तोडगा काढला तर गोवा हे बुडून मरणाऱ्यांचे शहर ठरेल अशी टीकाही त्यांनी केली आहे.

हरमल किनाऱ्यावर रविवारी सायंकाळी 64 वर्षांच्या रशियन पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. सकाळी कर्नाटकमधील दोन पर्यटकांना हरमल किनाऱ्यावरुन बुडताना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. जीवरक्षकांचा संप सुरु झाल्यापासून 14 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. सरकारने या प्रश्नावर संवेदनशीलता दाखवणे महत्वाचे आहे. जीवरक्षकाना सरकारी सेवेत सामावून घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करणे गरजेचे आहे, असे मतही कामत यांनी व्यक्त केले आहे. सरकारने त्वरीत यात हस्तक्षेप न केल्यास पर्यटन व्यवसायच बुडण्याची भीती कामत यांनी व्यक्त केली. अशा घटना वाढू लागल्यास गोवा हे जलसमाधीस्थळ म्हणून बदनाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आपला जीव धोक्यात घालून, दुसऱ्यांचे जीव वाचवण्याची सेवा बजावणाऱ्या गोमंतकीय जीवरक्षकांना सर्व मदत व सहकार्य देणे सरकारचे कर्तव्य  आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही कामत म्हणाले. गोव्यातील पर्यटन व्यवसाय सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. रद्द झालेली चार्टर विमाने, शॅक वाटपात झालेला विलंब तसेच देशात आलेले आर्थिक मंदीचे सावट यामुळे पर्यटन उद्योगावर परिणाम झाला आहे. सरकारला पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी त्वरीत उपाय करणे गरजेचे आहे, याकडे कामत यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यानी त्वरित संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व गोमंतकीय जीवरक्षकाना सरकारी सेवेत घेण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणीही कामत यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या