
कांदा व्यापाऱ्याकडून कांदा घेऊन तो ठरलेल्या ठिकाणी न पोहोचवता तिघांनी कांद्याची परस्पर विक्री करून कांदा व्यावसायिकाची 13 लाख 6 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची घटना नेप्ती येथे घडली. 29 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती.
नानासाहेब उर्फ राजेंद्र चंद्रभान आवारी (वय 41, रा.सारसनगर) यांचा नेप्ती कांदा मार्केटमध्ये गाळा आहे. त्यांच्याकडून रविंद्र बद्रीनाथ म्हस्के (रा.गोगलगाव, ता.नेवासा, नगर), मुन्नाभाई एजंट (रा.कोठला), निजाम शेख (रा.केडगाव) यांनी 1.24 टन 240 किलो वजनाचा 13 लाख 6 हजार 500 रुपये किंमतीचा कांदा ओदिशामध्ये नेण्यासाठी ट्रकमध्ये 29 डिसेंबर रोजी भरला होता. त्यानंतर ते ओदिशाकडे रवाना झाले. मत्र, अद्याप कांद्याची पोहोच झाल्याचे ट्रकचालक किंवा एजंट यांनी आवारे यांना सांगितले नाही. त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे आवारे यांच्या लक्षात आले. ट्रकमधील कांद्याची तिघांनी परस्पर विक्री करून त्यांची फसवणूक केली आहे. आवारे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी राजेंद्र आवारे यांच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहेत.
































































