
राजेंद्र वाडेकर । राहुरी
गावराण कांद्याला चक्क 1 रूपया किलोचा बाजारभाव मिळाल्याने उत्पादक शेतक-यांनी व्यापा-याला देण्याऐवजी नगर मनमाड राज्य मार्गावर कांदा फेकून आपला संताप व्यक्त केला. शेतक-याने रस्त्यावर कांदे टाकून दिल्याच बातमी वा-यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.
मंगळवारी राहुरी येथे कांद्याचा मोंढा असल्याने तालुक्यातील साञळ येथील शेतकरी नामदेव विश्वनाथ शिंदे व वाकडी तालुका राहाता येथील शेतकरी गोरख भाऊसाहेब जाधव यांनी राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर कांदा विक्रीसाठी आणला होता. दुपारी कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर शिंदे तसेच जाधव या शेतक-याच्या कांद्यावर अवघी 1 रूपया किलोच्या बाजारभावाने बोली लागली. कष्टाने पिकविलेल्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव ऐकून या शेतक-यांचे डोळे पाणावले. मात्र 1 रूपया किलोचा बाजारभाव हा थट्टा करण्यासारखा ठरला असल्याने या संतप्त झालेल्या शेतक-यांनी मोंढ्यावर आणलेला कांदा उचलून तडक नगर मनमाड राज्य मार्गावर जाऊन फेकून दिला.
किलोला 1 रूपया हा कांद्याचा कवडीमोल बाजारभाव पाहता या शेतक-याला वाहतूक खर्च वसुल होणे मुश्किल झाले. कांद्याचे बाजारभाव शेतक-यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे असल्याचे विश्वनाथ शिंदे यांनी म्हटले.या कांद्याच्या लागवडी पासुन पिक हाती येईपर्यंत तब्बल 22 हजार रूपये खर्च झाला आहे.कांदा काढणा-या मजूराची रोजंदारी 175 रूपये तर शेतीतुन बाजार समिती पर्यंत आणण्यासाठी एका गोणीला 50 रूपये वाहतुक खर्च येत आहे. कांद्याची तोलाई, मापाई व हमाली हा खर्च कांदा पिकातून वसूल होणे अवघड बनले आहे. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बढाया शासन पातळीवर मारल्या जात असताना शेतमालाची मातीमोल भावाने विक्री करण्याची दुर्दैवी वेळ शेतक-यांवर आली आहे.



























































