कांदा फक्त पाच रुपये किलो, एपीएमसीत आवक कमी तरी भाव गडगडले

4242
onion-market

एपीएमसी मार्केटमध्ये कांदा अवघ्या पाच रुपये किलोने विकला जात आहे. मुंबई आणि परिसराला दररोज 130 ट्रक कांद्याची आवश्‍यकता असते. मात्र सध्या मार्केटमध्ये फक्त 20ट्रक कांदा येत असतानाही त्याचे भाव गडगडले आहेत.

मान्सूनच्या पावसाची उशीरा झालेली सुरुवात आणि परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम यामुळे यंदा कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसला. परिणामी कांद्याच्या भावाने शंभरी गाठली. सप्टेंबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत ग्राहकांना कांदा सोन्याच्या भावाने खरेदी करावा लागला. मात्र आता हाच कांदा एपीएमसीच्या कांदा बटाटा मार्केट मध्ये अवघ्या पाच रुपये किलो या दराने विकला जात आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात प्रत्येक दिवशी कांद्याची जेवढी मागणी असते, त्या तुलनेत फक्त 15 ते 20 टक्के कांदा सध्या एपीएमसी मार्केट मध्ये येत आहे. तरीही दर मात्र एकदम कमी झाले आहेत. मार्केटमध्ये आज फक्त 21 गाडी कांदा आला. त्यापैकी निम्माच माल विकला गेला, असे कांदा बटाटा मार्केटमधील व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.

ग्राहकांनी पाठ फिरवली

कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर बंद करण्यात आले कांदा बटाटा मार्केट आता पुन्हा सुरू झाले असले तरी मार्केट कडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. मार्केटमध्ये प्रवेश करण्यात प्रशासनाने अनेक निर्बंध टाकल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्राहक मार्केटमध्ये येण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी आवक कमी असूनही मालाला उठाव नाही

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

चालू वर्षी वर्षभर हवामान प्रतिकूल राहिले. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने फक्त लाल कांद्याचे नुसकान झाले नाही तर उन्हाळी कांद्याचे रोपेही अनेक ठिकाणी खराब झाली. त्या आणीबाणीच्या प्रसंगातही शेतकऱ्यांनी कांदा पिकवला. मात्र आता हाच कांदा कवडीमोल दराने विकला जाऊ लागल्यामुळे त्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या