कर्ज फेडण्यासाठी तो करत होता फसवणूक; बनावट ऑनलाइन खरेदीच्या वेबसाइटचा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन खरेदीसाठी बनावट वेबसाइट तयार करून चुना लावणाऱया गुजरातमधील कॉम्युटर इंजिनीअरच्या सायबर क्राईम ब्रॅंचने मुसक्या आवळल्या. त्याने आतापर्यंत 22 हजार ग्राहकांची फसवणू केली आहे.

अटक आरोपी हा मूळचा गुजरातचा रहिवासी असून त्याने परदेशात शिक्षण घेतले होते. कपडा व्यवसायासोबत तो वेबसाइट बनवण्याचे काम करायचा. व्यवसायात नुकसान झाल्याने त्याच्यावर कोटय़वधी रुपयाचे कर्ज झाले होते. नोटबंदी आणि जीएसटीमुळे त्याचा व्यवसाय पार बुडाला. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. त्याचदरम्यान अटक आरोपीने एका व्यक्तीला वेबसाइट बनवून दिली होती. त्याने ती वेबसाइट नको असल्याचे सांगितले.

वाढते कर्ज पाहता त्याने सुरुवातीला त्या वेबसाइटवरून कपडे स्वस्तात विकण्यास सुरुवात केली. त्यात त्याला थोडा नफा झाला. जर आपण ग्राहकांकडून पैसे घेऊन त्याना वस्तूच न दिल्यास आणखी फायदा होईल असा विचार करून त्याने गेल्या दिवाळी सणापासून फसवणुकीला सुरुवात केली. महागडय़ा वस्तू 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकण्यास त्याने सुरुवात करून तो ग्राहकांना वस्तू न देताच चुना लावत होता.

पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ निरीक्षक एस. सहस्रबुद्धे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक खोपीकर, नाळे, कोकाटे, ठाकूर, थोरात पांचाळ यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी कौशल्याचा वापर करून अटक आरोपीची माहिती काढली. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक गुजरात येथे गेले. तेथून आरोपीला अटक करून मुंबईत आणण्यात आले.