ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याला नोएडातून अटक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एकाला सांताक्रुझ पोलिसांनी दिल्लीच्या नोएडा येथून बेडय़ा ठोकल्या. चंद्रशेखर असे त्याचे नाव आहे.

तक्रारदार हे एका ट्रस्टशी संबंधित आहेत. संस्थेच्या माध्यमातून गरीबांना उपयोगी वस्तूचे वाटप केले जाते. त्यांनी गेल्या वर्षी  कॉपरच्या बाटल्या खरेदीसाठी आपण इच्छुक असून नाव, पत्ता आणि फोन नंबर एका ऑनलाइन पोर्टलवर सेव्ह केला होता. त्यानंतर चंद्रशेखरने त्याची माहिती गुगलवरून काढली. त्याने तक्रारदारांना फोन केला.  स्वस्तात बाटल्या मिळत असल्याने तक्रारदाराने 300 बाटल्यांची ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर चंद्रशेखरने तक्रारदारांना ऑनलाइन पैसे पाठवण्यास सांगितले.

बाटल्या लवकर पोहचतील असे भासवण्यासाठी तक्रारदारांना व्हॉटस्ऍपवर फोटो पाठवले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी 60 हजार रुपये भरले. पैसे भरल्यावर चंद्रशेखरने फोन बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदारांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्या पथकातील उपनिरीक्षक संजय सरोळकर, दळवी, चौरे यांनी तपास सुरू केला.