
सामना ऑनलाईन, मुंबई
एक तरी वारी अनुभवावी, याचि डोळा याचि देही बघावी.. असं आपण म्हणतो. मात्र प्रत्येकाला पंढरीच्या वारीला जायला मिळतंच असं नाही. नोकरी, व्यवसाय, शिक्षण यामुळे इच्छा असूनही वारीत सहभागी होऊ शकत नाही. अशा भक्तांना ‘अक्षयवारी’ घडवण्याचे काम सध्या व्हॉट्सअॅपवरून सुरू आहे. वॉट्सअॅपवरून युवा वारकर्यांनी माऊलीच्या पालखीचा सोहळा जगभरात पोचवला आहे.
वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून ‘अक्षयवारी’ या सोशल मिडीया उपक्रमाद्वारे संपूर्ण पालखी सोहळा व्हॉट्सअॅपवर बघता येत आहे. या उपक्रमातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तसेच अन्य संतांच्या पालख्या आणि त्यातील दिंडय़ा यांची माहिती जगभरात पोचवली जात आहे. पालखी नेमकी कुठे आणि कोणत्या गावावरून मार्गक्रमण करणार आहे, त्याचे फोटो तसेच पालखीचा मुक्काम असे सारे अपडेटस् दिले जातात. इजिनीयरिंगचे शिक्षण (बी. ई.) घेणार्या अक्षयमहाराज भोसले यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील दिंडी क्रमांक १६ मध्ये सहभागी आहेत आणि तेच त्यांच्या टीमपर्यंत अपडेटस् देत आहेत.
तरुणाईचा वारीकडे ओढा
पंढरीच्या वारीत तरुणाईचा सहभाग वाढताना दिसत आहे. उत्सुकतेपोटी म्हणा किंवा फोटो काढण्यासाठी म्हणा, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे म्हणा… तरुण मंडळी वारीमध्ये सहभागी होत आहेत. व्हॉट्सअॅप अक्षयवारीचे संयोजक अक्षयकुमार महाराज यांनी सांगितले, ‘विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालण्याचा आणि वारीतील युवाशक्ती वाढवण्याचा विचार आहे.’
व्हॉट्सअॅप वारीत ७० हजार लोक
वारीच्या अपडेट्ससाठी ‘अक्षयवारी’ असा संदेश ८४५१८२२७७२ या क्रमांकावर पाठवल्यास आपण या उपक्रमाचा भाग होतो. आतापर्यंत या व्हॉट्सअॅप वारी उपक्रमात ७० हजार लोक जोडले गेले आहेत. यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि अन्य देशातील ४०० ते ४५० जणांचा समावेश आहे. एकूण २० जणांची टीम मुंबईतून काम करीत आहे. त्यांचे अंदाजे ५०० ग्रुप आहेत.




























































