
पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाची ’जंगल सफारी’ मुंबईकरांसह जगभरात लवकरच नियमित ऑनलाइन पाहता येणार आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर या उपक्रमात नियमित प्रसारण होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राणी बाग बंद असल्याने सध्या दररोज बुडणारा लाखो रुपयांचा महसूल जास्तीत जास्त प्रमाणात वसूल होण्यास मदत होणार आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रमात 30 हजारांहून जास्त जणांनी प्रतिसाद दिला होता.
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राणी बाग पर्यटकांसाठी बंद आहे. यामुळेच दररोज तब्बल दीड लाखांचा महसूल बुडत आहे. असे असताना अनलॉक प्रक्रिया सुरू असली तरी मुंबईत पुन्हा रुग्णवाढ होत असल्याने सद्यस्थितीत पर्यटकांसाठी राणी बाग सुरू होणे शक्य दिसत नाही. या पार्श्वभूमीवर पालिकेचा सोशल मीडियावर राणी बागेची ’ऑनलाइन सफारी’ घडवणारा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये राणी बागेतील वाघ, चित्ता, तरस, अस्वल, हत्ती, अजगर, शेकडो पक्षी आणि ऐतिहासिक राणी बागेचा वारसा पर्यटकांना फेसबुक, यू टय़ूब, ट्किटरवर ‘लाइव्ह’ पाहता येणार आहे. दरम्यान, राणीबाग बंद असल्याने उत्पन्न बुडत असून मुंबईवरच नक्हे, तर देशभरातील पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेचा ऑनलाइन राणीबाग जंगल सफारीचा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे.
असे मिळणार उत्पन्न
पालिकेच्या माध्यमातून पर्यटकांना फेसबुक, यूटय़ूब,ट्विटरवर राणीबागेची ‘लाइव्ह’ सफर घडवली जाईल. या उपक्रमाला सोशल मीडियावर दाखवण्यासाठी मिळणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून महसूल मिळेल. शिवाय प्रत्येक ’लाइव्हा शो’ला मिळणाऱ्या ‘लाईक्स’च्या प्रमाणानुसार महसूल मिळणार आहे. प्रस्ताव पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर रीतसर निविदा प्रक्रिया राबवून उपक्रम नियमित सुरू होणार असल्याची माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
सध्या दररोज दीड लाखाचा महसूल बुडतोय
राणीच्या बागेत मार्च 2017 मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली आहे. दररोज सुमारे पाच हजार तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी दहा ते पंधरा हजारांपर्यंत पर्यटक येत आहेत. याआधी दररोज 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न एक लाखांपासून सहा लाखांपर्यंत काढले आहे.
यामध्ये सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख आणि महिना सरासरी 45 लाखांवर गेले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राणीबाग पर्यटकांसाठी बंद असल्याने प्रतिदिवस दीड लाखाचा महसूल बुडत आहे.


























































