`डी’ वॉर्डमध्ये कोरोनाबाधितांसाठी ऑनलाइन योगा

मलबार हिल, पेडर रोड, नेपियन्सी रोड अशा उच्चभ्रू लोकवस्त्यांमध्ये फैलावणारा कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोरोना हेल्थ सेंटरमध्ये रुग्णांना औषधोपचारांबरोबरच ऑनलाइन योगा आणि ध्यानधारणा असे पूरक उपचारही केले जात आहेत. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढल्याचे ‘डी’ वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

पालिकेचा ‘डी’ वॉर्ड म्हणजेच ग्रँट रोड परिसरात एक हजारांवर सोसायट्या आहेत. सुरुवातीला या ठिकाणी नियंत्रणात असलेला कोरोना अचानक वाढू लागल्याने पालिकेचे आव्हान वाढले होते. मात्र संपूर्ण वॉर्डमध्ये परिणामकारक निर्जंतुक मोहीम आणि प्रभावी क्वारंटाइन यामुळे आता रुग्णसंख्या आटोक्यात यायला सुरुवात झाल्याचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये जास्त रुग्ण आढळल्यामुळे या सोसायट्यांमध्ये व्हिजिट देऊन निर्जंतुकीकरणावर नजर ठेवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 48 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टीमने रुग्ण आढळलेल्या 60 सोसायट्यांमध्ये धडक देऊन स्क्रिनिंग, तपासणी केली जात आहे. गेल्या आठवडाभरात 45 ते 50 च्या सरासरीने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आता प्रतिदिवस 30 वर आल्याचेही ते म्हणाले.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा

‘डी’ वॉर्डमध्ये आतापर्यंत एकूण 2630 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मात्र यातील 1890 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता 624 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. यातील 80 टक्क्यांवर रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली असून तेदेखील लवकरच कोरोनामुक्त होतील असे गायकवाड यांनी सांगितले. योगा आणि ध्यानधारणा उपक्रम सुरू केल्यानंतर 100 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या