नांदेड : 1972 पेक्षाही भयावह दुष्काळ, जिल्ह्यात फक्त 13 टक्के पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

नांदेड जिल्ह्यात 1972 पेक्षाही भयावह दुष्काळाची परिस्थिती यावर्षी निर्माण झाली असून, जिल्ह्यात केवळ 13 टक्केच पाऊस झाल्याने या पावसाच्या भरवश्यावर केलेल्या 66 टक्के पेरण्या पूर्णतः वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट नांदेड जिल्ह्यावर येवून ठेपले आहे. दुसरीकडे विष्णुपूरीतील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत असल्याने महापालिकेने आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

जूनचा पूर्ण महिना आणि जुलैचा अर्धा महिना उलटला तरी नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. आतापर्यंत फक्त 327 मि.मी.पाऊस पडला आहे. मागच्यावर्षी हाच पाऊस 434 मि.मी.होता. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. तीन दिवसापूर्वी जो पाऊस पडला त्यामुळे आशेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. आज नांदेड जिल्ह्यात एकूण 8 लाख 48 हजार 900 हेक्टरांपैकी 5 लाख 64 हजार 200 हेक्टरमध्ये विविध पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पेरणीची एकूण सरासरी 66 टक्के आहे. तथापी या पेरण्यांमुळे आलेले कोंभ पावसाच्या ओढीमुळे जळून जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

पीकनिहाय पेरणीचे क्षेत्र खालीलप्रमाणे. भात-150 हेक्टर, ज्वारी-21 हजार 986 हेक्टर, मका-737 हेक्टर, तूर-55 हजार 118 हेक्टर, मूग-21 हजार 676 हेक्टर, उडीद-21 हजार 568 हेक्टर, इतर कडधान्य-284 हेक्टर, तीळ-201 हेक्टर, कारळे-163 हेक्टर, सोयाबीन-2 लाख 47 हजार 251 हेक्टर, कापूस-1 लाख 95 हजार 108 हेक्टर. बाजरी कडधान्य आणि खरिप भुईमूग यांची पेरणी अद्याप झालेली नाही. येत्या दोन दिवसात जर पाऊस पडला नाही आणि पावसाने जोर धरला नाही तर आहे ते कोंभ जळून जावून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार उद्यापासून मराठवाड्यात पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. तथापी यापूर्वीही हवामान खात्याने 15 जुलैपासून पाऊस सुरु होईल असे म्हंटले होते. तो पाऊस दमदार असेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतू 15 तारखेस पाऊस न पडल्यामुळे आता 19 तारखेचा अंदाजही कोलमडतो की काय, या विचाराने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.

विदारक चित्र
नांदेड जिल्ह्यात 1972 पेक्षाही विदारक चित्र यावेळी निर्माण झाले आहे. यावर्षी केवळ 13 टक्केच पाऊस झाल्याने तो आजपर्यंतच्या गेल्या अनेक वर्षातील पावसाचा निच्चांक आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः व्याकूळ झाला आहे. सबंध जिल्ह्यातच ही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याने ठिकठिकाणी परमेश्वरांचा धावा करत कुठे अनुष्ठान, कुठे अन्नदान, कुठे देवाला पाणी टाकणे तर कुठे प्रार्थना होत आहेत. नांदेड शहराला होणारा पाणीपुरवठा विष्णुपूरीतील पाणीसाठा बाष्पीभवनाने झपाट्याने कमी होत असल्याने नांदेडकरांना आता उद्यापासून आठ दिवसाआड पाणी मिळणार आहे. अनेक विभागामधले वेळापत्रक कोलमडले असून, जुन्या भागात तर दहा दिवसाला पाणी मिळत आहे. गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच ही परिस्थिती नांदेड जिल्ह्यात निर्माण झाल्याने बळीराजा मात्र चिंतेत पडला आहे.