तिसऱ्या लाटेला मुलांचा ‘दे धक्का’, बाधितांमध्ये फक्त 2 टक्के मुले; शाळांचे टेन्शन नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत तिसऱया लाटेतील एकूण 2 लाख 50 हजार 872 बाधितांमध्ये 1 ते 10 वर्षे वयोगटातील फक्त 2 टक्के मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तिसऱया लाटेत 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असला तरी यात एकाही मुलाचा समावेश नाही. त्यामुळे तिसरी लाट आटोक्यात आल्यामुळे बालवाडीपासूनच्या शाळा सोमवारपासून सुरू होत असताना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत 21 डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात 150 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या 20 डिसेंबरपर्यंत 250 पर्यंत वाढली होती, मात्र यानंतर सर्वाधिक वेगाने वाढणाऱया ओमायक्रोनचा प्रसार वाढल्याने रुग्णसंख्येने थेट 21 हजारांवर झेप घेतली. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवडय़ात तिन्ही लाटांमधील दैनंदिन रुग्णसंख्येने विक्रमी नोंद केल्याने मुंबईचे टेन्शन वाढले होते, मात्र आठवडाभरात दहा हजारांवर तर गेल्या आठवडाभरापासून सहा हजारांपर्यंत दैनंदिन रुग्ण नोंद होत आहे. ही रुग्णसंख्या काही दिवस स्थिर राहून उतरणीला लागेल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

– मुंबईत तिसऱया लाटेत 5230 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे, मात्र एकही मृत्यू नाही.
– सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने पालिका प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली आहे. शाळेच्या गेटवर स्क्रिनिंग, मोफत मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था असेल.