Only बटाटा

मीना आंबेरकर

नऊ दिवस चालणारे उपवास… उपवासी पदार्थातील मुख्य घटक बटाटा… पाहुया बटाटय़ाच्या चवीष्ट पाककृती…

नवरात्र आदिमायेचा उत्सव राक्षसांचे निर्दालन करण्यासाठी तपश्चर्येला बसलेली आदिमाया. या आदिमायेची घटस्थापना करून तिच्या तपश्चर्येला आपण साथ देतो. आदिमायेबरोबर आपणही क्रतस्थ राहण्याचा प्रयत्न करतो. या नवरात्रोत्सवात कित्येक जण उपवास करून देवीचे पूजापाठ करतात. घटस्थापनेच्या दिवशी उपवास, अष्टमीचा उपवास, काहींचे तर नवरात्रातील नऊ दिवस उपवास… अशा रितीने देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्वचजण कार्यरत असतात. असे हे उपवास करताना उपासाला बळ देण्यासाठी आपण उपवासाच्या पदार्थांचे सेवन करतो. अर्थात नऊ दिवस निभावताना आपल्यासारख्या सामान्यांना उपवासाच्या पदार्थांचे पाठबळ असते. या उपवासाच्या पदार्थांत मोठा सहभाग असतो तो बटाटय़ाचा. कारण बटाटा हा पिष्टमय पदार्थ आहे आणि उपवास करताना ऊर्जा मिळविण्यासाठी याची गरज असते. म्हणून आज आपण ‘ओन्ली आलू’ पाहणार आहोत.

sandi-1

बटाटा-नारळ वडय़ा

साहित्य…5-6 मध्यम बटाटे, 1 नारळ, साखर, वेलची पूड.

कृती…बटाटे उकडून सोलून, किसून घ्यावे. नारळाचे खोबरे भाजून घ्यावे. त्याच्या निम्मी साखर घ्यावी. बटाटय़ाचा लगदा मोजून त्याच्या निम्मी साखर घ्यावी. नंतर सर्व एकत्र करून गॅसवर ठेवावे. मिश्रण घट्ट तर होत आले की त्यात वेलची पूड घालावी. मिश्रण नरम गोळीबंद झाले की, उतरवावे. तूप लावलेल्या थाळीत थापावे. गार झाल्यावर वडय़ा कापाव्यात.

chutney-1

बटाटय़ाची गोड कचोरी

साहित्य….7-8 जरा मोठे बटाटे, मीठ, मिरपूड, थोडे तिखट, 2 चमचे वरी तांदळाचे पीठ. (सारणासाठी) एक मध्यम नारळ, खोबऱयाचा निम्मी साखर, 2-3 वेलदोडय़ाची पूड.

कृती….बटाटे वाफेवर उकडून घ्यावे. गरम आहे तोवरच किसून घ्यावे. त्यात थोडे तिखट, मीठ, मिरपूड व वरीच्या तांदळाचे पीठ घालून हलक्या हाताने मिश्रण कालवावे. साखर, खोबरे एकत्र करून गॅसवर ठेवावे. दोन मिनिटे ढवळून लगेच उतरवावे. त्यात वेलची पूड घालावी. बटाटय़ाचा लिंबाएवढा गोळा घ्यावा. त्याची पारी करावी. त्यात साखर खोबऱयाचे सारण भरून बंद करावी. त्याला थोडा लाडवासारखा आकार द्यावा. नंतर रिफाइंड तेलात तळाव्या. दहय़ाच्या चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

dahi-wada-2

बटाटय़ाचा दहीवडा

साहित्य…250 ग्रॅम लिंबाएवढय़ा आकाराचे बटाटे, 2-3 वाटय़ा घट्ट दही, अर्धा चमचा भाजलेली जिरे पूड, आल्याचा 1 लहानसा तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्या, मीठ, तुपाची फोडणी.

कृती… बटाटे उकडून सोलून घ्यावेत. थोडय़ा तुपावर परतून घ्यावा. नंतर प्रत्येक बटाटय़ाला चाकूने चीर द्यावी व बाजूला ठेवावे. आले मिरच्या वाटून घ्याव्यात. दही घुसळून घ्यावे. त्यात मीठ, मिरच्या, आले, जिरे पूड व थोडी साखर घालावी. मिश्रण एकजीव करावे. वरून तुपाची जिरे घातलेली फोडणी घ्यावी. नंतर बटाटे घालून थोडावेळ मुरू द्यावे. नंतर सर्व्ह करावे.

पोटॅटो रोल

साहित्य…7-8 बटाटे, 1 वाटी ओले खोबरे, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडी कोशिंबीर, थोडा पुदिना, अर्धे लिंबू, मीठ 3 चमचे, राजगिरा पीठ.

कृती…बटाटे उकडून, सोलून किसून घ्यावे. त्यात राजगिरा पीठ व मीठ घालून ठेवावे. ओले खोबरे, मिरच्या, कोथिंबीर, पुदिना व मीठ यांची चटणी वाटून घ्यावी. चटणीवर लिंबू पिळणे, बटाटय़ाचे मोठय़ा लिंबाएवढे गोळे करावेत. जितके बटाटय़ाचे गोळे होतील तितके चटणीचे गोळे करावेत. पोलपाटावर जाड प्लास्टिक पसरावे. त्यावर एक गोळा ठेवून हाताने जरा दाबावे. वरून प्लॅस्टिक घालून हलक्या हाताने लाटावे. मोठय़ा पुरीप्रमाणे होईल. नंतर त्यावर पुदीना चटणी पसरावी व गुंडाळी करावी. नंतर त्याचे 1 इंचाचे तुकडे कापून तळावे.

बटाटय़ाचा रस्साpotato-rassa

साहित्य…5-6 उकडलेले बटाटे, अर्धी वाटी शेंगदाणा कट, 2-3 आमसुले, तिखट मीठ, गूळ.

कृती…बटाटे सोलून त्याच्या फोडी कराव्यात. 3-4 फोडी पाण्यात घालून कुस्कराव्यात. तुपाची, जिरे घालून फोडणी करावी. त्यात बटाटय़ाच्या फोडी व पाण्यात कुस्करलेले बटाटे घालावे. त्यामुळे रस चांगला दाट होतो. तिखट, मीठ, दाण्याचा कूट व आमसुल घालावी. वाटल्यास आणखी थोडे पाणी घालावे. जरा उकळले की उतरवावे. हा रस्सा थोडा झणझणीतच लागतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या