परीक्षेचा पेपर सोडविताना पाठय़पुस्तके, नोट्समध्ये पाहून उत्तरे लिहिण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळाली तर… केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यंदा नववी ते बारावीसाठी ओपन बुक परीक्षा घेण्याचा विचार करीत आहे. बोर्डाच्या नववी-दहावीच्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान, तर अकरावी, बारावीच्या इंग्रजी, गणित आणि बायोलॉजी विषयांसाठी ओपन बुक परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आखला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आणलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ातील शिफारशीनुसार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर ओपन बुक परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सीबीएसईने तयार केला आहे. ओपन बुक परीक्षेत विद्यार्थ्यांना पूर्ण प्रश्नपत्रिका सोडविण्यास किती वेळ लागला, याचा आढावा सीबीएसई घेणार आहे. विद्यार्थी परीक्षागृहात पाठय़पुस्तके, नोट्समध्ये पाहून प्रश्नांची उत्तरे लिहू शकतात. याआधी दिल्ली विद्यापीठाने कोरोना काळात विद्यार्थ्यांना ओपन बुक परीक्षा माध्यमातून परीक्षा देण्याची संधी दिली होती.
ओपन बुक परीक्षा सोपी नाही
ओपन बुक परीक्षा सध्याच्या परीक्षा पद्धतीएवढी सोपी नाही. ओपन बुक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कठीण ठरत आहे. या प्रकारच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती नव्हे, तर त्या विषयाप्रती विद्यार्थ्यांची समज, विश्लेषण करण्याची पद्धत आणि कॉन्सेप्ट स्पष्ट करण्याची क्षमता यावर अवलंबून आहे. ही परीक्षा म्हणजे पुस्तकातील उत्तराचा मजकूर जसाच्या तसा उत्तरपत्रिकेत उतरविणे असे नाही. या परीक्षा पद्धतीत विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता, विश्लेषण पद्धत, गंभीर, सर्जनशील विचार, समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्याची क्षमता यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.