महापालिकेच्या 200 शाळांमध्ये ओपन जिम; विद्यार्थ्यांसह पालकांनाही सुविधा

पालिका शाळांत शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता शाळांमध्ये ओपन जिम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात उपनगरातील  200 शाळांमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. विशेष म्हणजे या सुविधेचा फायदा मुलांसह पालकांनाही घेता येणार आहे. यामध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी 100 शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि अत्याधुनिक सुविधांसह 27 प्रकारच्या शालेय वस्तू मोफत देण्यात येत आहेत. यामुळे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून गेल्या दोन वर्षांत सुमारे दोन लाख विद्यार्थी वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी इतर सुदृढ आरोग्यासाठी ओपन जिम प्रयोगचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महापालिकेच्या या शाळांमध्ये सध्या उद्यानांमध्ये ज्याप्रकारे ओपन जिमचे साहित्य बसवले जाते, त्याच प्रकारे बसवले जाणार आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यातून शारीरिक कसरत करता येईल. मुलांना शाळा भरण्यापूर्वी तसेच मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यानंतर या ओपन जिमचा लाभ घेता येईल. तसेच शाळा सुटण्यापूर्वी किंवा शाळा भरल्यानंतर मुलांना सोडण्यास येणाऱया पालकांनाही या ओपन जिमचा लाभ घेता येईल. यासाठी उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दहा कोटी रुपये मंजूर करून महापालिकेला अदा करण्यात आले आहेत.

दहा कोटींचा खर्च

z उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी महापालिकेला प्राप्त झाल्याने यासाठी निविदा मागवून साहित्याची खरेदी केली जात आहे. यासाठी झेनिथ स्पोर्ट्स या पंपनीची निवड झाली आहे. यासाठी 9.73 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

z ओपन जिममध्ये एअर वॉकर, चेस्ट प्रेस डंबेल्स, शोल्डर बिल्डर डंबेल्स, स्टँडिंग-सीटिंग ट्विस्टर, मल्टी फंक्शनल डंबेल्स, एक्सर सायकल अशा प्रकारे तब्बल 200 प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.