अजित पवार हे भाजप सोडून परत शरद पवारांकडे आले असते, तर तो ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवारांचा पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्या पक्षाचा चेहरा मराठमोळा आणि महाराष्ट्राचा होता. आता त्या पक्षावर गिधाडे तुटून पडतील आणि लचके तोडतील, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच अजित पवार हे भाजप सोडून परत शरद पवारांकडे आले असते, तर तो ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता असेही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवारांकडे परत आले असते, तर तो ‘ऑपरेशन लोटस’चा सर्वांत मोठा पराभव ठरला असता. त्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा देखील ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा प्रश्न लोक विचारत आहेत, असे राऊत म्हणाले. देशात इतक्या निर्घृण पद्धतीने राज्यकारभार सुरू आहे की कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही. जो भाजपच्या विरोधात जाईल, तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, असे वातावरण देशात निर्माण झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत जे सत्य मांडले, त्यानंतर नरवणे यांचीही सुरक्षा वाढवावी, अशी मागणी राऊत यांनी केली. भाजप किंवा यंत्रणा काय करतील, याचा भरवसा राहिलेला नाही, असे ते म्हणाले. अजित पवारांचा पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्या पक्षाचा चेहरा मराठमोळा आणि महाराष्ट्राचा होता. आता त्या पक्षावर गिधाडे तुटून पडतील आणि लचके तोडतील, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

नवाब मलिकांच्या मुद्द्यावर बोलताना भाजप व शिंदे गटावर त्यांनी जोरदार टीका केली. पूर्वी त्यांना न घेण्याची भूमिका घेतली, मग आता त्यांच्याच नगरसेवकांची चाटूगिरी का केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खोट्या प्रकरणांत अडकवून तुरुंगात टाकले आणि मुसलमान म्हणून आरोप केले, कारण निवडणुकीत फायदा घ्यायचा होता, असेही त्यांनी म्हटले.

सरकारवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, हे सरकार कोणत्याही विचारांचे नाही. हे सरकार हिंदुत्ववादी नाही, राष्ट्रवादी नाही. सत्ता, पैसा आणि भ्रष्टाचार हाच या सरकारचा विचार आहे. सावरकर त्यांना फक्त राजकारणासाठी लागतात.

कायदा जर सर्वांसाठी समान असेल, तर मग मंत्र्यांची आणि राजकीय नेत्यांची मुले कशी वाचतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तीन हजार कोटींची जमीन जर 300 कोटींमध्ये मंत्र्यांच्या मुलाला मिळत असेल आणि त्याला वाचवले जात असेल, तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणे आणि त्याला प्रतिष्ठा देणे हेच फडणवीस सरकारचे उद्दिष्ट असल्याचा दावा त्यांनी केला.