Operation Sindoor – कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, पाकिस्तानात 30 वर्षांत दहशतवाद्यांचे मोठे जाळे

गेल्या 30 वर्षांत पाकिस्तानात दहशतवाद्यांचे मोठे जाळे उभे राहिले असून ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेवरून पाकिस्तानच दहशतवाद पोसत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले. आम्हाला तपास यंत्रणांकडून दहशतवादी तळांबद्दल खात्रीशीर माहिती मिळाली होती. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यातील मृतांना न्याय म्हणून एअर स्ट्राईक केल्याचे सोफिया कुरेशी यांनी सांगितले.

या वेळी विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी एअर स्ट्राईकचे व्हिडीओ फुटेज दाखवले. तसेच पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानातील कोणत्या दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला हे नकाशाद्वारे समजावून सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे व्योमिका सिंह म्हणाल्या.

तरुणांची माथी भडकावणारी केंद्रे उभारली

पाकिस्तानात दहशतवाद्यांनी मोठे जाळे निर्माण केले. यात तरुणांना कारवायांमध्ये जोडून घेणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांचे ब्रेन वॉश करून त्यांची माथी भडकावून त्यांना धर्मांध बनवणारी केंद्रे उभारणे, लाँच पॅड अशा अनेक गोष्टी असून पूर्ण पाकिस्तानभर आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये हे सर्व घडत आहे. एअर स्ट्राईकमुळे दहशतवाद्यांचे हे जाळे विस्कळीत करण्यात आल्याचे कुरेशी यांनी सांगितले.