‘ऑपरेशन सिंदूर’वेळी हिंदुस्थानने पाकिस्तानची सहा विमाने नष्ट केली, हवाई दलप्रमुख एपी सिंग यांचा दावा

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या शक्तीशाली क्षेपणास्त्र प्रणालीमुळे पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि देखरेखीसाठी असलेले एक मोठे विमान आपण नष्ट केले अशी माहिती हवाई दलप्रमुख एपी सिंग यांनी दिली.

बंगळुरू येथे 16 व्या एअर चीफ मार्शल एलएन कात्रे मेमोरियल लेक्चरमध्ये हवाई दलप्रमुख एपी सिंग बोलत होते. पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यात दहशतवादी अड्डे नष्ट करून 100 वर दहशतवाद्यांचा खात्मा केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ काळात पाकिस्तानचे किती विमाने पाडली? याचा खुलासा पहिल्यांदाच हवाई दलप्रमुख एपी सिंग यांनी केला आहे.

आपल्या हवाई संरक्षण प्रणालीने मोठी कामगिरी केली. आपण अलिकडे खरेदी केलेली एस-400 प्रणाली गेमचेंजर ठरली. या प्रणालीमुळे पाकिस्तानच्या विमानांना आपण दूर ठेवू शकलो. आपल्या एस-400 प्रणालीमुळे पाकिस्तान ग्लाइड बॉम्ब वापरू शकला नाही. एस-400 मुळे हे बॉम्ब आसपासही येऊ शकले नाहीत. असे ते म्हणाले.

हिंदुस्थानने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली. तसेच हवाई देखरेखीसाठी असलेले एअरबोर्न अर्ली वॉर्निग अॅण्ड पंट्रोल हे मोठे विमानही नष्ट केले.या विमानांव्यतिरिक्त आपण मोठय़ा संख्येने पाकिस्तानचे युएव्ही आणि ड्रोन्सही नष्ट केली. पाकिस्तानची काही क्षेपणास्त्रे हिंदुस्थानच्या हद्दीत पडली होती. त्याचे अवशेष गोळा केले असून त्याचा अभ्यास सुरू आहे. ती क्षेपणास्त्रे कुठून सोडण्यात आली? त्यांनी कोणता मार्ग अवलंबला होता? क्षेपणास्त्रे सोडणारी प्रणाली कशी आहे ही सर्व माहिती या अभ्यासातून आपल्याला मिळू शकेल असे हवाई दलप्रमुखांनी सांगितले.

हल्ल्यानंतरचे फोटो दाखवले

हिंदुस्थानी हवाई दलाने जबरदस्त कामगिरी करताना दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालयावर हल्ले करू ते नष्ट केले. हल्ल्याच्या पूर्वीचे आणि नंतरचे फोटो हवाई दलप्रमुख सिंग यांनी यावेळी दाखवले. ज्या इमारतींना लक्ष्य केले गेले ती माहिती गुप्तचर यंत्रणेवर आधारित होती. त्यावेळी चांगली गोष्ट घडली. आमच्याकडे केवळ सॅटेलाईट फोटो नव्हते तर स्थानिक माध्यमांकडून आम्हाला बरेच इनपुट मिळाले होते. जे आम्हाला आतील फोटो देत होते अशीही माहिती हवाई दलप्रमुखांनी दिली.