
ऑपरेशन सिंदूरमुळे तीळपापड झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री काय केले आणि त्याची पाकला कोणती किंमत मोजावी लागली याची माहिती हिंदुस्थानच्या सैन्याने आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. लेह ते सरक्रीकपर्यंत 36 सैन्य आणि नागरी ठिकाणांवर पाकिस्तानने 300 ते 400 तुर्की ड्रोनसह हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत घुसून हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एअर डिफेन्स सिस्टमने तो हाणून पाडण्यात आला. पाकचे अनेक ड्रोन पाडण्यात आले, अशी माहिती लष्कराकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. पाकिस्तानला ड्रोनद्वारे हिंदुस्थानच्या हवाई दलाची हेरगिरी करायची होती. पण पाकच्या या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले, असे लष्कराने सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचा आणखी एक कट उघड केला आहे. पाकिस्तान सीमेवरील धार्मिक स्थळांवर हल्ला करत आहे आणि त्यासाठी हिंदुस्थानलाच दोष देत आहे. शक्रुवारच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी संपूर्ण पुराव्यांसह पाकिस्तानचा कट उघड केला.
India Pakistan War- तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची बैठक
हिंदुस्थानवर हल्ल्यासाठी पाकने तुर्की बनावटीच्या असिसगार्ड सोंगर ड्रोनचा वापर केला. हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण यंत्रणेची हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानने तुर्कीच्या ड्रोनचा वापर केला. हा ड्रोन हल्ला विशेषतः हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे स्थान आणि प्रतिक्रिया, वेळ यासारख्या महत्त्वाच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी केल्याचे हिंदुस्थानच्या लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देत हिंदुस्थानने संयमित कारवाई केली. हिंदुस्थानने ड्रोनद्वारे पाकिस्तानच्या चार शहरांवर हल्ला केला. अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले जिथून हिंदुस्थानला हल्ला करण्यात येत होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पाकिस्तानने सीमेवर अनेक ठिकाणी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू केला आहे. यात हिंदुस्थानचे काही जवान जखमी झाले आहेत. हिंदुस्थानने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे प्रचंड नुकसाने झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाकिस्तानने चिथावणीखोर कारवाया केल्या. त्यांनी हिंदुस्थानची शहरे, नागरी पायाभूत सुविधा आणि काही लष्करी तळांना लक्ष्य केले. मात्र, हिंदुस्थानच्या लष्कराने पाकला चोख प्रत्युत्तर दिले, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले.