
सामना प्रतिनिधी, मुंबई
चीनमधील कम्युनिस्ट सरकारकडून ‘फालून दफा’ ही आध्यात्मिक चळवळ चिरडून टाकण्याचे प्रयत्न 20 वर्षांपासून सुरू आहेत. 20 जुलै रोजी त्याला दोन दशके पूर्ण होतील. त्यानिमित्त ‘फालून दफा असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने शुक्रवारी वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड येथे चीनच्या जुलमाचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.
ध्यानधारणा आणि योगाच्या माध्यमातून निसर्गाकडून शक्ती मिळवायची आणि तिचा जगाच्या कल्याणासाठी वापर करायचा अशा उद्देशाने ‘फालून दफा’ ही चीनमध्ये 1992 मध्ये सुरू झाली, परंतु 20 जुलै 1999 पासून चीनमधील कम्युनिस्ट सरकारने ही चळवळ दडपण्यास सुरुवात केली होती. अजूनही या चळवळीशी संबंधित हजारो लोकांना चीनच्या तुरुंगात डांबले गेले आहे. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात. त्या अत्याचाराच्या निषेधार्थ या चळवळीशी संबंधित मुंबईतील अनुयायी बॅण्ड स्टॅण्ड येथे शुक्रवारी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान निषेध नोंदवणार आहेत.
























































