धनगर आरक्षणावरून विधान परिषदेत गदारोळ, सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारला काहीच निर्णय घेता आलेला नाही. धनगर आरक्षणाबाबतचा टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल आल्याचे सरकार सांगतेय. पण त्यांनी हा अहवाल सभागृहात सादर न करता ऍटर्नी जनरलकडे दिला. याचाच अर्थ धनगर समाजाला सरकारला आरक्षण द्यायचेच नाही, असा आरोप करत विरोधकांनी विधान परिषदेत प्रचंड गदारोळ केला. काही केल्या गोंधळ शांत होत नसल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशी घोषणाबाजी केली. तर विरोधकांनी वापरलेले शब्द असंसदीय असून ते कामकाजातून काढून टाकण्याची मागणी सत्ताधार्‍यांनी लावून धरली. या गोंधळामुळे सभापतींना कामकाज पाच वेळा तहकूब करण्यात आले.

दुपारी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे स्थगन प्रस्ताव मांडत महसूलमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला, मात्र हा स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळून लावला. त्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला. अखेर सभापतींनी सभागृहाचे कामकाज गोंधळातच रेटून नेले. सर्व शासकीय कामकाज सभागृहासमोर ठेवण्यात आले. तसेच 93 च्या सूचना आणि लक्षवेधी पुढे ढकलण्यात आल्या. अखेरीस सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

 

गाजर, पाझर आणि आजार

राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते यांनी सरकारने धनगर समाजाला गाजर दाखवल्याचे आपल्या कवितेतून सांगितले. तर प्रवीण दरेकर यांनी सरकारला धनगर समाजासाठी पाझर असल्याचे सांगत त्यांच्या कवितेवर कुरघोडी केली. याला उत्तर म्हणून सुधीर तांबे यांनी सरकारला खोटे बोलण्याचा आजार असल्याचा आरोप केला.

…कुणाच्या बापाची जहागीर नाही

सरकार धनगरांच्या बाजूने आहे. धनगरांना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारच न्याय देईल, असे प्रवीण दरेकर म्हणाले. तर धनगर समाज, मराठा समाज ही कुणाच्या बापाची जहागीर नाही. त्यामुळे ते आम्हाला मिळायलाच हवे, अशा शब्दांत जगताप यांनी सरकारचा निषेध केला. यावर विनायक मेटे, प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांनी जगताप यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. तसेच त्यांनी वापरलेले शब्द असंसदीय असून ते कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. यावर सभापतींनी जगताप यांचे वाक्य तपासून मग त्यातील असंसदीय शब्द कामकाजातून काढून टाकू असे सांगितले.