ज्यांचा आपसात संवाद नाही त्यांच्याशी संवाद कसा होणार? विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये आपसातच सुसंवाद नाही. त्यांच्याशी संवाद कसा होणार, असे सांगत विरोधकांनी रविवारी सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीने सर्वप्रथम आपसात संवाद साधावा आणि मग आम्हाला चहापानासाठी आमंत्रित करावे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मारला.

विरोधी पक्ष व मित्र पक्षांच्या आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. महिलांवरील वाढते अत्याचार हा अत्यंत गंभीर मुद्दा असून आम्हाला यावर राजकारण करायचे नाही. महिला अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना कराव्यात आम्ही सरकारला पाठिंबा देऊ असे फडणवीस म्हणाले.

शेतकरी कर्जमाफी
शेतकऱयांना 25 हजार रुपये हेक्टरी अवकाळी अनुदान देण्याची सरकारने घोषणा केली, पण एक नवा पैसा शेतकऱयांना दिलेला नाही. 25 हजार रुपये हेक्टरी कोरडवाहूला आणि 50 हजार हेक्टरी फळबागांना देण्याची घोषणा झाली होती. पण त्यावरूनही त्यांनी घूमजाव केले आहे. आता कर्जमाफीवरून अशरक्षः दिशाभूल करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
राष्ट्रवादीचा विरोध असतानाही एनआयएला शहरी नक्षलीवादाचा तपास करण्याची भूमिका स्वीकारल्याबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सभागृहात अभिनंदन करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सर्व योग्य पुरावे पाहिल्यानंतरच हा निर्णय घेतला असेल, असे मत व्यक्त करत याबाबत पोलिसांकडे प्रचंड प्रमाणात पुरावे आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जाऊनही जामीनही मिळालेला नाही आणि निर्णयही पोलिसांच्या बाजूने आला. याची व्याप्ती महाराष्ट्रापुरती नाही तर देशातील अनेक राज्यांपर्यंत पोहोचलेली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी जी काही कागदपत्रे शोधून काढलेली आहेत त्यामध्ये विविध राज्यांतील व्याप्ती यामधून बाहेर आलेली आहे. म्हणूनच एनआयएची यामध्ये आवश्यकता आहे. महाराष्ट्र पोलीस केवळ महाराष्ट्रापुरते चौकशी करू शकतात. पण इतर राज्यांतील जे पुरावे आले आहेत त्या संदर्भात एनआयएच्या बाबतीत जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे, असेही फडणवीस म्हणाले. सीएए कायदा आणि एनपीआर यासंदर्भातील भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे, त्याचे फडणवीस यांनी स्वागत केले. सीएए कायदा कोणाचेही नागरिकत्व घेत नाही, तर नागरिकत्व देणारा कायदा आहे. त्यासंदर्भात अफवा पसरवून देशामध्ये, राज्यामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न चालला आहे ते अयोग्य आहे, असेही ते म्हणाले.

हे स्थगिती सरकार
केवळ स्थगिती देण्याचे काम सरकारकडून सुरू असून हे स्थगिती सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. जलयुक्त शिवार योजना बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. पण जनतेच्या असलेल्या या योजना जनताच बंद होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सत्कार
काँग्रेस पक्षाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान होत आहे. पण भाजप व महाराष्ट्र हा अवमान खपवून घेणार नाही. 26 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या विधानमंडळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव झालाच पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये पुढाकार घ्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

वारिस पठाण यांचा समाचार
100 कोटी हिंदूंवर 15 कोटी मुस्लिम भारी पडतील असे वक्तव्य करणारे एमआयएमचे खासदार वारिस पठाण यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. असले वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही. हिंदू समाज सहिष्णू आहे. पण हिंदू समाजाच्या सहिष्णूतेला दुर्बल समजण्याचे पाप कोणी करणार असेल तर त्याची औकात दाखवण्याची ताकत देखील हिंदू समाजामध्ये आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठणकावले

विरोधकांमध्येच ताळमेळ नाही
या पत्रकार परिषदेत फक्त देवेंद्र फडणवीसच बोलत राहिले. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना बोलण्याची संधीच दिली नाही. रासपचे महादेव जानकर आणि आरपीआयच्या आमदारांनी दांडी मारली. रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत तर उशिराच पोहोचले. त्यामुळे विरोधकांमध्येच ताळमेळ नसल्याचे यावेळी दिसून आले.