सीमावादाच्या प्रश्नावरून विरोधी पक्ष आक्रमक; शहांच्या बैठकीत ठरल्यानंतरही खासदारांना प्रवेश बंदी का? अजित पवारांनी विचारला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली असून सीमावाद प्रश्नावरून विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात अत्यंत कडक भूमिका मांडत सरकार समोर प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘आम्ही अनेक वर्ष सभागृहात काम करत आहेत. आपण निवडून आल्यावर आपण पूर्ण राज्याचं प्रतिनिधित्व करतो. मुख्यमंत्री, मंत्री हे पूर्ण राज्याचे नसतात. निवडून आल्यानंतर आपण कुठल्या पक्षाचं चिन्ह लावून इथे येत नाही. नवीन पायंडे पाडू नयेत’, असं अजित पवार यांनी सुरुवातीला सुनावलं.

‘काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावाद प्रश्नावर एक महत्त्वाची बैठक घेतली. सीमाप्रश्नासंदर्भात जे वाद निर्माण झाले आहे, काही गावांनी ठराव करताहेत, बातम्या देताहेत. खरं तर प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. आपणही लढतो आहोत, तेही लढताहेत. निकाल आपल्या बाजूने लागावा असं तमाम महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं. परंतु, त्या बैठकीत जे ठरलं ते सभागृहातील दोन व्यक्तींना माहित आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. पेपरला जे आलं त्यात म्हटलं आहे की 6 डिसेंबर रोजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांनी महापरिनिर्वाण दिनी गोंधळ नको म्हणून तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यानंतर कुणीही कुणाला इकडे तिकडे जाण्यास रोखणार नाही असं ठरलं होतं. मात्र आपल्या एका खासदाराला तिथे येण्यास बंदी केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती त्यासाठी लढत आहे. अमित शहांसमोर आता कुणी कुणाला रोखणार नाही, असं ठरलेलं असताना देखील जिल्हाधिकारी असा निर्णय कसा घेऊ शकतो?’, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर सभागृहात या घटनेवर शेम… शेम… असा आवाज घुमला.

‘खासदार लाखो लोकांचे प्रतिनिधी असतात. तेव्हा त्यांना रोखणे योग्य नाही. आपण जावं, त्यांनी यावं. कोर्टात काय तो निकाल लागेल. मात्र अशा प्रकारची दडपशाही ही खपवून घेता कामा नये’, असंही त्यांनी सुनावलं. कर्नाटकच्या कुरापती या सातत्याने सुरू आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे, असंही त्यांनी ठणकावलं.

यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना नोंद घेतली असं म्हणत पुढच्या कामकाजाकडे जाऊ अशी भूमिका घेतली. त्यामुळे थोडा गोंधळ झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका मांडली. आम्ही महाराष्ट्राची भूमिका ठोस शब्दात मांडली. क्रियेला प्रतिक्रिया होऊ शकते, असं आम्ही सांगितलं. त्यानंतर गृहमंत्र्यांनी त्यांना समज दिली की कुठल्याही परिस्थित अशा प्रकारची घटना होता कामा नये. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे तेव्हा असे काही करू नये. केंद्राची भूमिका त्यांनी मीडियासमोर मांडल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.