
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशातील ‘कैराना’ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने हादरलेल्या भाजपने सत्तेचा दुरुपयोग केला. ‘ईव्हीएम’मध्ये ३०० ठिकाणी छेडछाड करीत मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांना अडवल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सकाळी मतदान सुरू झाल्यापासून कैराना येथे ईव्हीएम बंद पडण्याच्या अनेक घटना घडल्या. विशेषतः मुस्लिम आणि दलित मतदार असलेल्या भागांमध्ये भाजपने ‘ईव्हीएम’ मशीन्स खराब केल्या. काही ठिकाणी सकाळी ९.३० पर्यंत मतदान सुरू होऊ शकले नाही. मतदान करायला आलेल्या नागरिकांना भाजप नेते आणि कार्यकर्ते अडवत होते असे तबस्सुम हसन यांनी म्हटले आहे.
भाजपची घाबरगुंडी
कैराना पोटनिवडणुकीत भाजपची घाबरगुंडी उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी गोरखपूर आणि फुलपूर येथे पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झटका बसला होता. कैरानामध्येही हादरा बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या मृगांका सिंह यांची लढत तबस्सुम हसन यांच्याशी आहे. हसन या राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार आहेत, मात्र हसन यांना सपा, बसपा, काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपची घाबरगुंडी उडाली आहे.



























































