
शेतकरी हे देशातील सर्वात मोठी ताकद आहे. इंग्रजांच्या जुलमी राजवटीला शेतकऱ्य़ांनी जुमानले नाही. जुलमी इंग्रजी सत्ता शेतकऱ्य़ांनी झुकवली. तुम्हालाही झुकावेच लागेल. काळे कायदे मागे घ्या, अशी मागणी करत राज्यसभेत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज बाधित झाले.
बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला राज्यसभेत सुरुवात झाली. त्यात सहभागी होताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला.
देशातल्या शेतकऱ्य़ांमध्ये मोठा असंतोष आहे. शेतकरी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. त्याला चिरडण्याच्या भानगडीत पडू नका, असा इशाराही आझाद यांनी दिला. सरकारने प्रतिष्ठेचा विषय न बनवता हे तीनही कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणीही आझाद यांनी केली. जम्मू-कश्मीरचा काढून घेण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जाही परत राज्याला बहाल करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आपचे तीन खासदार दिवसभरासाठी निलंबित
राज्यसभेत सभापतींनी वारंवार आवाहन करूनही आम आदमी पार्टीचे तीन खासदार सातत्याने घोषणाबाजी व सभागृहात सुरू असलेल्या गदारोळाचे चित्रीकरण करत असल्यामुळे राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू प्रचंड संतापले.
संजय सिंग, सुशील गुप्ता, एन. डी. गुप्ता हे सभापतींनी सांगूनही त्यांच्या आदेशाचे उलंलघन करत असल्याचे पाहून नायडू यांनी नियम 255 अंतर्गत आपच्या तीन खासदारांना दिवसभरासाठी निलंबित केले.
लोकसभेतही प्रचंड गदारोळ
तीन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत, ही मागणी विरोधकांनी लोकसभेतही लावून धरली. त्यामुळे कामकाज बाधित झाले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला.
मात्र, त्याचवेळी विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करू लागले. सभापती बिर्लाही या वर्तनामुळे चांगलेच संतापले. तुमच्या अशा वागण्यामुळे देशाची जगभर अप्रतिष्ठा होत आहे, असे सांगत त्यांनी कामकाज दुपारी पाचपर्यंत व त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत तहकूब केले.



























































