
तपास यंत्रणा या वास्तविकपणे निःपक्ष असतात, असायला हव्यात. मात्र सध्या केंद्रीय सरकारच्या तालावर तपास यंत्रणा काम करत आहेत. या यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर राजकीय सूड उगवून त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होतोय. आपण देशाचे संवैधानिक प्रमुख आहात. याप्रकरणी हस्तक्षेप करून सरकारला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षांनी आज नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एक संयुक्त पत्र यानिमित्त राष्ट्रपती मुर्मू यांना पाठवले आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, आम आदमी पार्टीचे संजय सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, माकपाचे ए. करीम आणि समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव यांच्यासह इतरही नेत्यांच्या या पत्रावर स्वाक्षऱया आहेत.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. महागाई आणि जीएसटी या जनतेशी संबंधित ज्वलंत मुद्दय़ांवर संसदेत चर्चा व्हावी अशी विरोधकांची इच्छा आहे, मात्र सरकार जाणीवपूर्वक या मुद्दय़ांपासून दूर पळत आहे. विरोधकांनी सरकारविरोधात आवाज उठवला की त्यांचा आवाज दाबण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो.
पेंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग विरोधकांविरोधात बेमालूमपणे केला जात आहे. या यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज बंद केला जात आहे. सुदृढ लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण नाही. तुम्ही लोकशाहीच्या संरक्षक आहात. याप्रकरणी हस्तक्षेप करून सरकारला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंतीही या संयुक्त पत्रात करण्यात आली आहे.



























































