
नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले निवडणुकीत सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करण्यासाठी अधिवेशन झाले.सरकारकडून ज्या काही घोषणा झाल्या त्या मुंबई,ठाणे,नवी मुंबई यासाठी झाल्या पण विदर्भासाठी एकही घोषणा करण्यात आली नाही.त्यामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक करणारे हे अधिवेशन होते अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे अधिवेशन झाले.सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले यांबाबत प्रश्न विचारूनही सरकारने कारवाई केली नाही अशी टीका सचिन अहिर यांनी केली.
विदर्भातील धान,सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बसला होता.धानाला आणि सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली पण सरकारने कारवाई केली नाही.राज्यातील तरुणांना. ड्रगचा विळखा आहे पण त्यावर ही कारवाईची ठोस भूमिका सरकारची नाही अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील म्हणाले या अधिवेशनात घोषणांचा नुसता पाऊस पडला. कापूस खरेदीचे केंद्र वाढवा ही मागणी केली पण त्याचा ही निर्णय झाला नाही. पैसे नाही खिशात पण घोषणा मात्र अपार अशी अवस्था महायुती सरकारची आहे. या सरकारने इतक्या घोषणा केल्या की त्यासाठी बजेट कमी पडेल अशी अवस्था आहे, अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी राज्यात गुंतवणूक येते, Mou झाले याबाबत सभागृहाला माहिती दिली पण ज्यांच्याबरोबर करार झाले त्या कंपन्या राज्यात येत नाही,प्रत्यक्षात गुंतवणूकच झालेली नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली.विरोधी पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्था बाबत प्रश्न उपस्थित केले त्यावर ठोस उत्तर मिळाले नाही त्यामुळे सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच आली अशी टीका जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी सभागृहात आक्रमकता दाखवत प्रश्न उपस्थित केले पण सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिली नाही अस शशिकांत शिंदे म्हणाले.

























































