
भिंगळोली येथील समर्थ नगरात भर दुपारी वणवा पेटला. वणव्याच्या आगीच्या विळख्यात काही निवासी घरे सापडली. वाढत्या वणव्यामुळे काही शेतकऱ्यांच्या फळबागाही होरपळल्या.
मंडणगड शहाराला लागूनच असलेल्या भिंगळोली गावातील समर्थ नगरात गुरुवारी भरदुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आगीचा वणवा भडकला. यावेळी आगीची माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी त्यांना दुखापतही झाली, मात्र त्याकडे त्यांनी लक्ष न देता आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. आगीमुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा होणार आहे. वणव्यात सुके गवत पेटून गेल्यावर आग आटोक्यात आली. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मंडणगड हे तालुक्याचे ठिकाण असले, तरी तालुक्यातील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, ग्राम न्यायालय ही सर्व प्रशासकीय कार्यालये ही भिंगळोली गावातच आहेत. त्यामुळे येथे आगीसारख्या आपत्कालिन घटना घडल्या तर अग्निशमन यंत्रणेची आवश्यकता आहे. दापोलीतील अग्नीशमन यंत्रणा नादुरुस्त आहे. त्यामुळे प्रशासनाने येथे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करून आपत्कालिन परिस्थितीत होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करावा, असे येथील नागरिक आणि शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
























































