
गणेश विसर्जनाच्यावेळी गोळा करण्यात आलेल्या निर्माल्यापासून 800 किलो सेंद्रीय खताची निर्मिती करुन पेणमधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण व संवर्धन, स्वच्छता अभियान, प्रौढ साक्षरता वर्ग, विहीर पुनर्भरण असे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. मागील दोन वर्षांपासून गणेश विसर्जनावेळी नदी व तलावात होणारे निर्माल्य गोळा करुन त्यापासून खत निर्मिती करण्याचा उपक्रम अभियानातर्फे राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत पेण तालुक्यातील पेण,वाशी,रावे,वाशी नाका,वरवणे,वरसई,सापोली, धावटे, वडखळ, जिते, हनुमानपाडा, आंबिवली, दादर, शिर्की, भाल अशा सोळा बैठकांतील 1341 श्री सदस्यांनी सप्टेंबर महिन्यात दीड दिवस, पाच दिवस व गौरी विसर्जनावेळी 27 टन निर्माल्य गोळा केले होते. मागील पाच महिने या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून 800 किलो सेंद्रीय खत तयार करण्यात पेणमधील श्री सदस्यांना यश मिळाले आहे. या सेंद्रीय खताचा उपयोग श्री सदस्यांनी केलेल्या वृक्षारोपणाकरीता करण्यात येणार आहे.






























































