जखमी प्राण्यांची ‘सृष्टी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शुभांगी बागडे

आईपासून दुरावलेलं पाडस, आजारातून बरं झालेलं माकड, अंध झालेला मोर, जखमी कोल्हा आणि असे वेगवेगळे प्राणी… कोण हाताला येऊन चाटतंय तर कोण मांडीवर विराजमान झालंय, तर एखादा पक्षी खांद्यावर बसत लाडिक गमती करतोय असा अनोखा सर्वसमावेशक संसार कुठे बघितलाय का?नसेलच, पण सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा असा संसार मात्र नक्की बघायला हवा आणि त्यांच्या कामाला दाद द्यायला हवी. आमटे कुटुंबीयांनी वन्य प्राण्यांना जीवदान देण्याचं व्रत नेटाने सुरू ठेवलं आणि त्यांना अनेक अनुयायी लाभले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत अनेक प्राणी आणि पक्षीप्रेमींनी मुक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी पाऊल उचललं. सृष्टी आणि सिद्धार्थ सोनावणे याच वाटेवरचे.

बीड जिल्हा तसा दुष्काळाच्या छायेतला. इथे माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागते, पण जिथे माणसांचाही फारसा विचार केला जात नाही तिथे प्राण्यांना कोण विचारणार? मात्र या मुक्या प्राण्यांचा विचार करत तागडगावच्या सोनावणे दांपत्याने वन्य प्राण्यांचे अनाथालय उभे केले आहे. प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या दांपत्याचं काम अनमोल आहे. या ठिकाणी या जोडप्याने जवळपास 15 एकर परिसरात प्राण्यांसाठी अनाथालय सुरू केले आहे. पाणी, भक्ष्य यांच्या शोधात मानवी वस्तीत आल्याने जखमी झालेल्या आणि आईपासून दुरावून अनाथ झालेल्या वन्य जीवांची ‘सृष्टी’ म्हणजे तागडगाव (ता. शिरूर, जि. बीड) येथील सर्पराज्ञी वन्य जीव पुनर्वसन केंद्र ! सर्पमित्र असलेल्या सिद्धार्थ यांनी 2001 मध्ये ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सिक्युअरी असोसिएशन’ही संस्था सुरू केली. तिच्या माध्यमातून त्यांनी ‘सर्पराज्ञी’ प्रकल्प हाती घेतला आहे. त्याद्वारे त्यांनी आतापर्यंत 10 हजारांहून अधिक वन्य जीवांवर उपचार करून त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडले आहे. सोनावणे पती-पत्नी या अनाथालयामध्ये जखमी, आजारी वन्य जीवावंर उपचार करतात. फक्त उपचार करून जखम बरी होत नसते हे या जोडप्याला माहीत असल्याने ते जखमी प्राणी-पक्ष्यांवर पोटच्या गोळ्याप्रमाणे जीव लावतात. बालपणापासूनच कन्य प्राण्यांबद्दल कळवळा असणाऱ्या सिद्धार्थ आणि सृष्टी यांनी 2003 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू केले. परिसरातील जखमी जनावरांचे आश्रयस्थान म्हणून ‘सर्पराज्ञी’ हा प्रकल्प ओळखला जातो.

हे काम करताना या दोघांनाही अनेक अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. याबाबत सृष्टी सोनावणे यांचा अनुभव फार बोलका आहे. ‘‘मुके जीव फार प्रेमळ असतात. माणसांना लळा लावतात. ते कधीच प्रेमाचा स्पर्श विसरत नाहीत. एकदा एक जखमी वानरी आमच्याकडे उपचारांसाठी होती. सर्व शुश्रूषा करून तिला जंगलात सोडलं, तर दुसऱ्या दिवशी ती दारात हजर. पुन्हा काही दिवस ठेवून तिला जंगलात सोडलं. तरी दोन दिवसांनी ती प्रकल्पावर आलीच. शेवटी तिला ठेवूनच घेतलं. असाच प्रकार घुबडाच्या बाबतीत घडला. त्याला उपचारांनंतर जंगलात सोडून आता तीन वर्षे झाली आहेत, परंतु तरीही दरवर्षी हे घुबड प्रकल्पावर भेटायला येतं.’’ अशा अनेक अनुभवांचे हे दांपत्य साक्षीदार आहे.

पुनर्वसनासाठी येणाऱ्या प्राण्यांच्या देखभालीकरिता या दांपत्याला बराच खर्च येतो. विशेषतः मांसाहारी प्राण्यांसाठी जास्त खर्च येतो. केकळ जिल्हय़ातीलच नव्हे, तर आसपासच्या गावांमधील जखमी, आजारी मुक्या प्राण्यांना सृष्टी यांच्या पुनर्वसन केंद्रात उपचारांसाठी आणले जाते. त्या प्रत्येक प्राण्याची नोंद वन विभागाकडे करण्यात येते. प्राण्यांच्या देखभालीचा हा संपूर्ण खर्च सोनावणे कुटुंबीय करतात. सोनावणे यांच्या संयुक्त कुटुंबाने प्राण्यांचे हे विस्तारलेले कुटुंबही सामावून घेतले आहे. सर्पराज्ञी केंद्र प्राण्यांच्या पुनर्वसनाबरोबरच इतरही कामांत कार्यरत असते. म्हणूनच या पुनर्वसन केंद्रात निसर्गपरिचय केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. 2013 च्या दुष्काळी परिस्थितीत ‘डब्ल्यूपीएसए’ने ‘मूठभर धान्य पक्ष्यांसाठी, एक रुपया पाण्यासाठी’ हा उपक्रम राबवला. त्यातून 50 क्किंटल धान्य आणि 70 हजार रुपये जमा झाले. या निधीतून जिल्हाभरात 500 पाणवठे तयार केल्याचं सोनावणे सांगतात. जिह्यात झालेल्या अवकाळी गारपिटीत शेकडो पक्षी गारांच्या माऱ्याने जखमी झाले. त्यावेळी शक्य तितक्या पक्ष्यांवर सोनवणे दांपत्यांने उपचार केले. सोनावणे दांपत्याचे हे काम आता बाळसे धरू लागले आहे. याबाबत सृष्टी सोनावणे सांगतात की, ‘‘हे काम करताना आनंद आहेच. माणसं संवाद साधून स्वतःला काय होतंय हे सांगू शकतात,पण मुक्या जीवांना कोणाचाच आधार नसतो. म्हणूनच ते मायेपोटी आपल्या जवळ येतात.’’ तुटपुंज्या उत्पन्नात झोकून देऊन काम करत असलेल्या सृष्टी यांच्या प्रेरणेचं रहस्य प्राण्यांवर असलेली माया हेच असावं.

[email protected]