
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला तरी गोरेगाव पश्चिम जवाहर नगर येथील ओशिवरा नदीचा गाळ काढण्याचे काम संथगतीने सुरू आहे. नदीची संरक्षण भिंत तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे नदीलगतच्या झोपडपट्टीतील शेकडो कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर ओशिवरा नदीच्या सफाईच्या कामाला वेग द्यावा तसेच नदीलगतची संरक्षक भिंत तत्काळ दुरुस्त करावी, अशी मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गोरेगावच्या ओशिवरा नदीला लागून रेल्वे पुलाच्या पश्चिमेस जवाहरनगर झोपडपट्टी आहे. येथे शेकडो कुटुंब राहतात. पावसाळा जवळ आला तरी मुंबई महापालिकेकडून ओशिवरा नदीच्या सफाईचे काम पूर्ण झालेली नाही. रेल्वेच्या अखत्यारितील पुलाखालीदेखील घाणीचे साम्राज्य पसरले असून रेल्वे प्रशासनाने त्याच्याकडे कानाडोळा केला आहे. ओशिवरा नदीतून मोठय़ा प्रमाणात गोरेगाव पूर्वेपासून वाहत पाणी येत असते. त्यातच नदीची संरक्षक भिंत तुटल्यामुळे पावसाळय़ात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास येथील घरात पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची भीती रहिवाशांना सतावत आहे.
परिसरातील लहान मुले आसपास खेळत असल्याने ती नाल्यात पडून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात महानगरपालिकेच्या मध्यवर्ती यंत्रणा (सेंट्रल एजन्सी) विभागाला तक्रार देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे.
शिवसैनिकांनी केली नदीची पाहणी
विधानसभा संघटक आणि माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी आज ओशिवरा नदीची पाहणी केली आणि स्थानिकांना भेडसावणाऱया समस्यांचा आढावा घेतला. यावेळी माजी शाखा संघटक राजश्री नाडकर, उपशाखाप्रमुख गंगाराम वैती, संजय भालेराव, गटप्रमुख दुर्गा सिंह, बाळा नायडू, साजिद शेख, अनिल सागवेकर, सिंधू लंका, कुमार भावे, उपविभाग संघटक रजनी लाड, रंजना वैती, अलका दळवी, विजया लंका, शैला आचारे, महेंद्र इगवे आदी उपस्थित होते.



























































