
धाराशिव जिल्ह्यातील 3 कोरोनाबाधित रुग्णांचा पहिला चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी दुसरा चाचणी अहवाल तपासणीसाठी पाठविला होता. हा दुसरा चाचणी अहवाल आज सोमवार, 20 एप्रिल रोजी सकाळी निगेटिव्ह आल्याने धाराशिव जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. त्यामुळे आता तिन्ही रुग्णांना रुग्णालयातून सुटी मिळणार आहे.
उमरगा तालुक्यातील एका पॉझिटिव्ह रुग्णावर 1 एप्रिलपासून तर शहरातील एक व लोहारा तालुक्यातील एक अशा तीन कोरोनाबाधित रुग्णावर उमरगा शहरातील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. तिघेही उपचाराला प्रतिसाद देत होते. त्यांची प्रकृतीही स्थिर होती. उपचाराचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने गुरूवारी त्या तिघांचे पहिली स्वॅब घेवून तपासणीला पाठविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्यांचा पहिला चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तूर्त दिलासा मिळाला होता. शुक्रवारी पुन्हा दुसरा चाचणी अहवाल पाठवण्यात आला होता. तो आज सोमवारी सकाळी प्राप्त झाला असून दुसरा चाचणी अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. जिल्हा, तालुका व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी तीन मेपर्यंत काळजी व दक्षता घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णालयातील टिम वर्कने केलेल्या कामाचे कौतूक जिल्हाभरातून केले जात आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांच्या कुटूंबातील व संपर्कातील लोकांचे दुबार तपासणी अहवालही निगेटिव्ह आले असून, कोरोना रुग्णालयातून आत्तापर्यत तीन पॉझिटिव्ह रुग्णांसह 176 स्वॅबपैकी 172 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंब व संपर्कात आलेल्या लोकांना विषाणूचा संसर्ग झाल्याची खात्री करण्यासाठी आरोग्य विभागाने दुबार स्वॅब घेऊन तपासणीस पाठविण्याचे नियोजन केले होते.
एका गावातील 22 जणांना खबरदारी म्हणून हायरिस्कच्या यादीत घेण्यात आले होते, त्यातील अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरातील सतरा जणांना हायरिस्कमध्ये घेण्यात आलेल्या सतरा लोकांचाही अहवाल निगेटिव्ह आला असून 110 जणांना रोग मुक्त करण्यात आले आहे. कोरोना रुग्णालयातील तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे दोन वेळा पाठवण्यात आलेले चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असले तरी तिघांनाही येणाऱया 14 दिवसांसाठी घरात निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. आरोग्य पथकामार्फत वेळोवेळी त्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यांच्या संपर्कातील बहुतांश लोकांचे दुबार अहवाल निगेटिव्ह आले असले तरी आणखी एक तपासणी होऊ शकते. शिवाय कसलीही लक्षणे नसताना अचानक अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकतो, असे काही ठिकाणी दिसून आल्याने नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी बाहेरचा संपर्क टाळून घरी थांबणे योग्य रहाणार आहे.



























































