
मध्य रेल्वे मार्गावरील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे अखेर ‘धाराशीव’ रेल्वे स्थानक म्हणून नामांतर करण्यात आले आहे. पूर्वी ‘यूएमडी’ या स्टेशन कोडने ओळखले जाणारे स्थानक आता ‘डीआरएसव्ही’ या नवीन स्टेशन कोडने ओळखण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच उस्मानाबाद शहर आणि जिह्याचे धाराशीव असे नामांतर केले आहे. मात्र रेल्वे स्थानकावर अद्याप उस्मानाबादच झळकत होते. अखेर रेल्वे स्थानकावरही उस्मानाबादच्या जागी धाराशीव झळकणार आहे. स्टेशनचे नवीन नाव आणि कोडला इंडियन रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, नावातील बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम 1 जून रोजी रात्री 11.45 ते मध्यरात्री 1.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.


























































