
बोगस दस्तावेज तयार करून बेकायदा टॉवर उभारणाऱ्या वादग्रस्त ओस्तवाल बिल्डरला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या असून या कारवाईमुळे भाईंदरमधील बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहे. उमरावसिंह ओस्तवाल याने पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार केली आणि राजरोसपणे टॉवर उभारले. त्यामुळे शेकडो ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून बगिचासाठी राखीव असलेले भूखंड हडप करून त्यावरदेखील अनधिकृत इमले उभारल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
अनधिकृत इमारती उभ्या करून ओस्तवाल बिल्डरने त्या अधिकृत म्हणून विकल्या आहेत. त्यासाठी त्याने पालिकेचे दस्तावेज बोगस तयार केले आहेत. सीसी आणि ओसीवर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी बनावट करण्यात आल्या असून शिक्केही बनावट वापरण्यात आले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ओस्तवाल बिल्डरच्या प्रकल्पात घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला.
१४ गुन्हे दाखल
विविध प्रकल्पांतील ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनुसार उमरावसिंह ओस्तवाल आणि त्याच्या सहकाऱ्यांवर नवघर, काशिमीरा, नयानगर आणि मीरा रोड पोलीस ठाण्यात सुमारे १४ गुन्हे दाखल आहेत. चार महिन्यांपूवी ओस्तवाल बिल्डरच्या विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा नव्याने दाखल झाला होता. त्यानंतर उमराव ओस्तवाल आणि कुलदीप ओस्तवाल फरारी झाले होते. फरारी आरोपींमध्ये प्रकल्पांच्या वास्तुविशारदाचाही समावेश आहे.
शेकडो ग्राहकांची फसवणूक करून त्यांना देशोधडीला लावणाऱ्या उमरावसिंह ओस्तवाल याला गुन्हे शाखेने शनिवारी रात्री अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलिसांनी ओस्तवाल बिल्डरला अटक केल्यानंतर मीरा, भाईंदर शहरातील बिल्डर लॉबीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ओस्तवालची तक्रार करणारे शिजॉय मॅथ्यू हे ओस्तवालच्या जामिनावर आव्हान देणार आहेत.