
प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांवर भाजप आणि मिंधे गटाच्या नेत्यांचा दबाव आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच आपल्या राज्यकर्त्यांनी नेपाळमधल्या उद्रेकाकडे गांभीर्याने पहावं असेही संजय राऊत म्हणाले.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सोलापुरात पोलिसांवर दबाव कुणी आणला हे उघड झालं आहे. अशा प्रकारचे दबाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत मग ते भाजप असेल किंवा मिंधे सेना असेल. या लोकांनी नेपाळच्या उद्रेकाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. लोकांच्या संतापाचा स्फोट झाला की काय होतं हे आम्ही नेपाळमध्ये पाहिलं आहे. राज्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणून मारलं आहे. हे या राज्यात आणि देशात होऊ नये. सहनशीलतेचा एक बिंदू असतो, एक अंत असतो. पुणे आणि नाशिकमध्ये त्या अंताने टोक गाठलं आहे. पुण्यातही आम्ही विराट मोर्चा काढणार आहोत. लोकं यांना कंटाळलेली आहेत. लोकांनी यांना निवडूनही दिलेले नाही, पण व्होट चोरीच्या माध्यमातून हे लोक सत्तेवर आले आहेत आणि सत्तेच्या जोरावर हे बेबंद आणि बेफाम झाले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल. नाशिकनंतर इतर शहरांत अशा प्रकारचे जनआक्रोश मोर्चे काढावे लागतील असे संजय राऊत म्हणाले.
कार्यकर्ते एकत्र आल्याशिवाय असे आंदोलन होत नाही. नाशिकमध्ये या मोर्चाचे आयोजन शिवसेना करत होती, त्यावेळी आमच्या लोकांनी असं सुचवलं की, की आपण मनसेलाही सोबत घेतलं पाहिजे. त्यातूनच हा मोर्चा निघतोय. आंदोलन करण्याची जमिनीवरची ताकद या दोन पक्षांचीच आहे असेही संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आहे की, जीआरमध्ये सरसकट हा शब्द वापरलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते हळूहळू ते बाहेर पडत आहे. त्यामुळे मला भिती आहे की, मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली तर या राज्यात अराजक निर्माण होईल. मला अशी भिती आहे की या राज्यात जातीय अराजकता निर्माण होऊ शकते.
कर्नाटकात एका स्थानकाला शिवाजी महाराजांचं होतं ते बदलण्यात आलं आहे. याबाबत आम्ही तर बोलूच पण आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बोलावं. याबाबत हे सरकार काय करत आहे, इथल्या काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांनी, एकनाथ शिंदे यांनीही त्या संदर्भात केंद्राला कळवायला पाहिजे असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.