
पालिकेच्या माध्यमातून नालेसफाईचे 99.53 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा डॅशबोर्डवर करण्यात आला असला तरी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यामध्ये परिणामकारकरीत्या काम व्हावे यासाठी पाणी तुंबल्यास संबंधित अभियंता आणि दुय्यम अभियंत्याला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पालिकेने 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यानुसार काम झाले असले तरी दरवर्षीचा अनुभव पाहता काही भागात पाणी तुंबण्याचा धोका आहे. त्यामुळे संबंधित अभियंता, दुय्यम अभियंता यांनी आपल्यावर जबाबदारी असलेल्या विभागाचे काम परिणामकारकरीत्या पार पडेल याची खबरदारी घ्यावी, अन्यथा कारवाईला समोरे जावे लागेल, असा इशाराच प्रशासनाकडून देण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्तावही पालिका प्रशासनाने तयार केल्याचे समजते. यामध्ये मोठय़ा नाल्यांची जबाबदारी अभियंता तर लहान नाल्यांची जबाबदारी दुय्यम अभियंत्यावर राहील, असे पालिका प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे.
‘त्या’ कंत्राटदाराला एक लाखाचा दंड
मुंबईतील नालेसफाईच्या कामात मिलन सब वेच्या ठिकाणी दिरंगाई आढळल्याने संबंधित कंत्राटदाराला पालिका प्रशासनाकडून एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर संबंधित काम ज्या इंजिनीयरच्या अंतर्गत येते त्या दोन ज्युनियर इंजिनीयरना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पालिकेकडून आपण केलेल्या कामाची सर्व माहिती नालेसफाईसाठी तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डवर जाहीर करण्यात येत आहे. यामध्ये गाळ काढण्याचे उद्दिष्ट आणि किती मेट्रिक टन गाळ काढला यासह गाळ वाहून नेणाऱ्या डंपरच्या फेऱ्यांची संख्या, नालेसफाई होण्याआधीचे फोटो, नालेसफाई झाल्यानंतरचे फोटो वेबसाईटवर टाकण्यात येत आहेत.

























































