
‘पु. ल. कट्टा’ या उपक्रमामध्ये कलाकारांना कार्यक्रम सादर करता येतील. कलाकारांना कोणतेही मानधन मिळणार नाही, परंतु आवश्यक त्या तांत्रिक बाबींची ध्वनी, प्रकाश यांची पूर्तता केली जाईल, असे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी सांगितले.
राज्यभरातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, तसेच सादरीकरणासाठी हक्काची जागा मिळावी या उद्देशाने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या पु. ल. कट्टा उपक्रम सुरू केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 2018 मध्ये या विशेष उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कोरोना काळात हा उपक्रम होऊ शकला नाही. मात्र आता पुन्हा पु. ल. कट्टा सुरू झाला आहे. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर रविवारी झालेल्या पहिल्या पु. ल. कट्टा उपक्रमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळाला.
पु. ल. कट्टय़ावर 12 जून रोजी ‘प्रयोगशाळा’ प्रस्तुत ‘पुरुषोत्तम’ या प्रयोगाचे सादरीकरण झाले. पुलंच्या अपरिचित साहित्याला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अपरिचित छटांना रसिकांसमोर आणणारा हा प्रयोग आहे. यामध्ये केवळ पुलंचे अपरिचित साहित्यच नव्हे तर पुलंनी लिहिलेली पत्रे, पुलंना काही दिग्गजांनी लिहिलेली पत्रे, लेख, उतारे यांचे भावस्पर्शी अभिवाचन तक्षिल खानविलकर, मल्हार शितोळे आणि सुमेध समर्थ या तीन कलाकारांनी करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच कल्पांगण सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत ‘जावे पु. लं.च्या गावा’ हा पु. लं.च्या साहित्यावर आधारित नृत्यनाटय़ रंगाविष्कार कल्पिता राणे व सहकाऱयांनी सादर केला. प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांची दाद दिली.

























































