उद्धव ठाकरे आणि पी. साईनाथ यांची ‘मातोश्री’वर भेट, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-p-sainath

सामना ऑनलाईन । मुंबई

देशातील नामवंत कृषीतज्ज्ञ पी. साईनाथ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘मातोश्री’ येथे बुधवारी भेट झाली. या भेटी दरम्यान दोघांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी चर्चा झाली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

‘मातोश्री’ वर भेट झाली त्यावेळी पिक विमा योजना, कर्जमुक्ती तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर उद्धव ठाकरे आणि पी. साईनाथ यांची चर्चा झाल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच पी. साईनाथ यांच्यासोबतचा फोटो देखील त्यांनी यावेळी ट्वीट केला आहे. पी. साईनाथ यांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत कृषीविषयक समस्यांची चर्चा करण्याची संधी मिळाली हे मी आपले भाग्य समजतो, असे ही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न शिवसेनेने उचलून धरले आहेत. शिवसेनेने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. दुष्काळग्रस्त भागातील चारा छावण्यांतील पशुपालकांसाठी ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद वाटप’ योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून पैसे मिळाले नाहीत त्यांची माहिती गोळा करून त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावे यासाठी शिवसेनेने पिक विमा मदत केंद्रांची सुरुवात केली आहे.