मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव-राज ठाकरेंना पूर्ण पाठिंबा, त्रिभाषा सूत्रावर पी. साईनाथ यांनी मांडली परखड भूमिका

हिंदी सक्ती लादणाऱया केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रावर बोट ठेवत ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक आणि लेखक पी. साईनाथ यांनी आज मराठीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला आपला जाहीर पाठिंबा दिला. मराठीसह महाराष्ट्रातील बोलीभाषांचे संरक्षण आणि संवर्धन यावरही त्यांनी जोर दिला.

मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात पी. साईनाथ बोलत होते. जास्तीत जास्त भाषा आपल्याला आल्या पाहिजेत. अनेक भाषा अवगत करण्याचा माझा प्रयत्न असतो, असे नमूद करत त्यांनी राज्यभाषा आणि बोलीभाषा टिकल्या पाहिजेत, असे निक्षून सांगितले. माझे आणि उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांचे विचार वेगळे असतील, पण मराठीबाबत त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्या मुद्दय़ावर माझा त्यांना पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.

माझी सर्वांना विनंती आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर काही मर्यादेपुरतेच करा. पत्रकारांनी क्रिएटिव्ह रायटिंगसाठी एआयचा वापर करू नये. क्रिएटिव्ह रायटिंगसाठी एआयचा केलेला वापर मेंदूला नाउमेद करणारा आहे, असे प्रतिपादन पी. साईनाथ यांनी केले.

आपण पत्रकार निवडणुकांचे वार्तांकन करतोय. त्यावेळी महिलांना चार हप्त्यांत 6 हजार मिळणार, अशा प्रकारच्या घोषणा ऐकायला मिळतात. पण हा पैसा कोठून आला, हे मीडिया विचारत का नाही? वास्तविक, हा पैसा महिलांच्या आशा, अंगणवाडी यांसारख्या सार्वत्रिक उपक्रमांमधून कापून तोच महिलांना हप्त्याहप्त्याने वाटला जातोय. अंगणवाडीचे हळूहळू खासगीकरण केले जात आहे. अशावेळी मीडिया कुठे आहे, असा प्रश्न साईनाथ यांनी उपस्थित केला आणि देशातील सध्याच्या खासगीकरणाच्या धडाक्यावर चिंता व्यक्त केली.

इन्कलाब झिंदाबादलाही देशविरोधी म्हटले जाते

देशातील सद्यस्थितीवर बोलतानाही त्यांनी परखड मते मांडली. ‘इन्कलाब झिंदाबाद’ हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा सर्वात मजबूत नारा होता. पण आज ‘इन्कलाब झिंदाबाद’लादेखील देशविरोधी म्हटले जातेय याचे आश्चर्य वाटते. मीडिया आणि पत्रकारिता या वेगवेगळय़ा गोष्टी बनल्या आहेत. पत्रकारितेचे व्रत जोपासताना पत्रकारांनी खूप चांगले काम केलेले आहे. पण मीडिया नफा कमावणाऱया संस्था बनल्या आहेत. गेल्या वर्षी मीडियाच्या एकूण महसुलापैकी 32 टक्के महसूल डिजिटल मीडियातून आला आहे. मुकेश अंबानी हे इंडियन मीडियामध्ये सर्वात मोठे मालक बनलेले आहेत. त्यात आता अदानी मीडियामध्ये घुसले आहेत. हे पैशांचे पेंद्रीकरण झाले आहेत, तसेच आजकाल मीडियाचे पेंद्रीकरण झाले आहे, असेही साईनाथ म्हणाले.

मराठी वाचवा अशी ज्यांची भूमिका आहे त्या सर्वांसोबत मी आहे. केवळ मराठी भाषाच नाही, तर महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. ती प्रत्येक भाषा टिकली पाहिजे.