पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे पणजीत निधन

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित आणि गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे अल्पशा आजाराने रविवारी पणजी येथे निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर पणजीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,विरोधी पक्षनेते दिगंबर कामत,राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आदींनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी केंद्र सरकारने 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक आणि भाषा चळवळीतील ते अग्रणी होते. आमोणकर यांनी आयुष्यात तब्बल चार वेळा कर्करोगावर मात केली होती. धम्मपद या बौद्ध धर्मग्रंथाचे कोकणीत भाषांतर करण्यासाठी ते पाली भाषा शिकले होते. त्याचप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, गोस्पेल ऑफ जॉन या धार्मिक पुस्तकांचे प्रवाही आणि प्रभावी कोंकणी अनुवाद वाचकांमध्ये प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी शेक्सपियरच्या निवडक नाटकांचा कोंकणी अनुवाद करायला सुरू केली होती. त्याची सुरुवात म्हणून शेक्सपियरच्या विविध नाटकातील प्रसिद्ध संवाद, म्हणी यांचे संकलन करून कोंकणी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केले होते. वर्षभरापूर्वीच त्यांची गोवा कोंकणी अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. साहित्य अकादमी आणि पद्मश्री पुरस्कारासह त्यांना ज्ञानपीठकार रवींद्र केळकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सोमवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव म्हापसा येथील शाळेत ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या