वेदनाशामक कशी घ्याल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. पवन सोनार, जनरल फिजिशियन

वेदनाशामक गोळी. काही दुखू लागल्यास आपल्या दैनंदिन जगण्याची छोटीशी प्रतिक्रिया… पण बऱ्याचदा त्याची सवय होते. अशा घ्याव्यात या गोळ्या…

आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळेच कामात गुंतलेले असतात. पण काम करत असतानाच अचानक डोकं ठणकायला लागतं… काहीवेळा हात किंवा पायच दुखू लागतो. दाढ त्रास देते. मग कामात खोळंबा… नेमक्या याचकेळी एक छोटीशी गोळी झटपट परिणाम करते अन् आपण काम सुरू करू शकतो. पण याच गोळ्यांचा अतिरेक झाला तर मात्र नसती पंचाईत होऊन बसते. कारण दोन तीन दिवसांनी पुन्हा डोकं दुखलं, पुन्हा वेदनाशामक गोळी… असं करताना त्या गोळ्यांचा अतिरेक होतो. म्हणूनच अशा स्थितीत वारंवार डोके का दुखते, ते डॉक्टरांकडून तपासून घेणं जास्त गरजेचं आहे.

वेदनाशामक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतल्या पाहिजेत. एखाद्या ठरावीक वेदनेवर डॉक्टर काही विशिष्ट गोळ्या लिहून देतात. डॉक्टर त्या गोळ्या दोन किंवा तीन दिवस घ्यायला सांगतात. त्यामुळे तेवढे दिवस त्या खास गोळ्या तुम्ही नक्की घेऊ शकता. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं आणि वारंवार घेणं हे आरोग्यासाठी अतिधोकादायक होऊ शकतं. स्वतःहून गोळ्या घेणं आरोग्यासाठी घातक ठरू शकेल. कारण आपल्या शरीराची स्थिती नेमकी काय आहे ती आपल्याला माहीत नसते. डॉक्टरच ती जाणतात. त्यामुळे डोकं दुखतंय म्हणून तुम्ही वारंवार वेदनाशामक गोळ्या घ्याल, पण तुम्हाला ऑसिडिटी वगैरे काही विकार असतील तर त्यामुळे अल्सर वाढू शकतात.
-डॉ. पवन सोनार, जनरल फिजिशियन

हे लक्षात असू द्या!
-रिकाम्या पोटी कोणतीही गोळी घेऊ नये.
-एकापेक्षा अधिक पेनकिलर घेण्याचा मोह टाळा. (गोळ्यांचा प्रभाव जाणवण्यासाठी साधारण १५ ते ३० मिनिटे लागतात. तोपर्यंत धीर धरा.)
– त्या गोळ्यांची स्वत:ला सवय लावु नका.
– दोन दिवसांपेक्षा जास्त काळ दुखणे सुरू राहिले, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
– घेत असलेल्या गोळ्यांच्या दुष्परिणामाविषयी डॉक्टरांकडून आधीच माहिती घ्या.
-दारूसोबत या गोळ्या घेणे धोकादायक असते.

स्वतःचे डॉक्टर बनू नका
साधारणपणे डोकेदुखीमध्येच वेदनाशामक गोळ्या घेतल्या जातात. डोकेदुखी सतत होत असेल तर ती सतत का होते ते तज्ञांना भेटून जाणून घ्यायला हवं. त्याच्या मुळापर्यंत जा आणि त्यांची कारणं शोधून काढा. त्यानुसार योग्य प्रकारे उपचार करा. स्वतःहून गोळ्या घ्यायला लागलात तर औषध हे काहीवेळा तुमच्यासाठी विषही ठरू शकेल. गोळ्यांचं दुसऱ्या गोळ्यांशी संपर्क आल्यास काय परिणाम होईल हे आपल्याला ठाऊक नसतं. ते डॉक्टरच जाणतात. आधीचा एखादा आजार असेल तर त्यातच या वेदनाशामक गोळ्या घेतल्यावर ते चुकीचे ठरून घात होतो.

कोणत्या गोळीने काय धोका होतो?
– क्रोसीन : या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्या गेल्या तर यकृताला धोका उत्पन्न होऊ शकतो. लिव्हर फेल्युअरही होऊ शकतं. या गोळ्या लहान मुलांना घातक ठरू शकतात.
– डिप्रीन : या गोळ्या वारंवार घेतल्या तर ऑसिडीटी खूप वाढणं, जठरामध्ये किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणं असे प्रकार घडतात. या गोळ्यांमुळे दमेकऱयांना दम्याचा अटॅक येऊ शकतो.
– कॉम्बिफ्लेम : या गोळ्यांच्या अतिरेकाने तीव्र ऑसिडीटी वाढू शकते किंवा जठरामध्ये रक्तस्राव होऊ शकतो. हृदयावरही विपरित परिणाम होतो.
– पॅरासिटेमॉल :डोकेदुखी किंवा बहुतांश सगळ्याच दुखण्यांत हे सर्रास वापरले जाते. त्याचा अतिरेक झाला तर दुष्परिणाम होणारच.
– आयबुप्रोफेन किंवा अस्पिरीन : सांधेदुखीत आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक उपयोगी पडतात. मात्र वेदना होत नसताना अधिक काळ या गोळ्या घेतल्यास पोट बिघडणे, रक्तस्राक, मूत्रिपिंड व हृदयाच्या कार्यक्षमतेकर परिणाम होऊ शकतो.