पैशांचा पाऊस भाग २३- म्युच्युअल फंड म्हणजे काय?

104
share-market

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असणारे बहुतेक जण “सर मी डिमॅट अकाउंट ओपन करून शेअर्समध्ये डायरेक्ट गुंतवणूक करू” की “म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करू?” असे प्रश्न विचारत असतात. या दोन्ही गुंतवणुकीचा उद्देश हा भविष्यातील गरजांसाठी लागणारी रक्कम उभी करणे किंवा आपल्या सध्याच्या मिळकतीचे रूपांतर मोठया संपत्तीत करणे हाच आहे परंतु दोन्ही मध्ये जोखीम वेगेवेगळ्या प्रकारची आहे.

म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

समजा मला मुबंई ते पुणे प्रवास करायचा आहे तर माझ्याकडे कोणते मुख्य पर्याय असतील……
• बस किंवा ट्रेन म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा
• स्वतःची कार
या दोन पर्यायापैकी कोणता पर्याय निवडावा हा माझा प्रश्न आहे तर आपण दोन्ही बाजू बघू या.

आता पहा माझ्याकडे स्वतःची कार आहे, मी स्वतः व्यवस्थित चालवू शकतो आणि या प्रवासातील सर्व धोके, सर्व करावे लागणारे खर्च हे मला माहित आहेत आणि मला अनुभवही आहे, तर स्वतःची कार घेऊन जाणे हा पर्याय आहे. पण जर समजा मला कार ड्राईव्ह करत जाणे, इतर गोष्टीची जोखीम अंगावर घेणे, कोणता मार्ग निवडू यात पडायचे नसेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट हा माझ्यासाठी बेस्ट पर्याय असेल. हे दोन पर्याय म्हणजे शेअर्समध्ये सरळ गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंड मार्फत गुंतवणूक आता तुम्हाला ठरवायचे आहे तुम्हाला काय योग्य वाटते.

म्युच्युअल फंड हे असे गुंतवणुकीचे साधन ते खास अशा गुंतवणूकदारांसाठी बनविले आहे.
• ज्यांना गुंतवणुकीचे ज्ञान नाही.
• ज्यांना वेळ नाही आणि
• ज्यांना शेअर बाजारातील चढ-उतारापासून दूर राहायचे आहे.

या नवीन किंवा अज्ञान गुंतवणूकदाराला शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी मिळावी म्हणून म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत असतात. नावाप्रमाणेच म्युच्युअल म्हणजे एकत्र आणि फंड म्हणजे पैसा. अशा प्रकारे लोकांचा पैसा एकत्र करून तो अभ्यासपूर्वकरित्या शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजेच म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जमा होणारा सर्व फंड योग्य अभ्यासपूर्वक गुंतवणूक करण्यासाठी Fund Manager असतात.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीबद्दल अजून जाणून घेऊया

१. शेअर्सचे जसे भाव असतात तसे म्युच्युअल फंडची NAV असते. (नेट अॅसेट व्हॅल्यू )
२. म्युच्युअल फंड तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीकडून किंवा डिमॅट अकाउंटलाही खरेदी करू शकता
३. म्युच्युअल फंड मध्ये दरमहा कमीत कमी ५०० रुपयापासून आणि एक रक्कमी ५००० अशी गुंतवणूक करू शकतो.
४. म्युच्युअल फंडची NAV दिवसाला बदलत असते.
५. नवीन म्युच्युअल फंड मधील पैसा ३ वर्षांसाठी कुलूप बंद म्हणजेच लॉक-इन पिरियडमध्ये असतो.
६. शेअर्समधील गुंतवणुकीप्रमाणे म्युच्युअल फंड मध्येही डिविडेंड मिळतो.
७. सरळ शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये जोखीम कमी असते.
८. नवीन गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे.

अशा रीतीने अभ्यास केल्यास एक लक्षात येते की शेअर्समधील गुंतवणूक ही जास्त फायद्याची पण जोखमीची ठरते. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही कमी फायद्याची आणि कमी जोखमेची ठरते. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखीम घ्यायच्या क्षमतेवर ठरवावे कुठे आणि किती प्रमाणात गुंतवणूक करायची.

आपली प्रतिक्रिया द्या