पैशांचा पाऊस भाग ४१- हिंदुस्थान : एक आर्थिक महासत्ता

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

काल आपण शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी असलेले पर्याय पहिले तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर पहिल्यांदा तुम्ही ज्या हिंदुस्थानी बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत आहात त्या हिंदुस्थानातील बाजारपेठे बद्दल तुम्हाला आशावाद असेल तरच तुम्ही शेअर बाजार मध्ये गुंतवणुकीला सुरुवात करा. माझे हे विधान तुम्हाला आवडणार नाही पण शेअर बाजार गुंतवणूक म्हणजे वेग-वेगळ्या उद्योग-धंद्या मध्ये केली जाणारी गुंतवणूक होय. त्यामुळे जर तुम्हाला हिंदुस्थानातील उद्योग-धंद्यावर, इथे असलेल्या ग्राहकांच्या क्षमेतवर, सरकारी धोरणावर जर तुम्हाला विश्वास नसेल तर तर तुम्ही गुंतवणुकीतही आशावाद निर्माण करू शकत नाही आणि अन्यथा तुम्ही अपयशी होऊन बाहेर पडाल.

हिंदुस्थानामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या हिंदुस्थानाला इतरांपेक्षा वेगळे करतात ज्यामुळे परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानाकडे आकर्षित होत आहेत हे पाहणे गरजेचे आहे. जिथे पिकते तिथे विकत नाही ही म्हण अगदी या परिस्थितीला सार्थ होते. कारण आज मोठ्या परदेशी कंपन्या हिंदुस्थानामध्ये उद्योग-धंदे उभा करून ग्राहकाच्या पसंतीच्या जागतिक दर्जाच्या वस्तू आणि सेवा ग्राहकांना पुरवित आहेत आणि त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत.

इतर देशापेक्षा हिंदुस्थानाला वेगळे करणारे घटक आपण पाहूया

१. युवा वर्ग :- आज आपण प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनात लोकसंख्या एक समस्या हा निबंध लिहला आहे. पण हीच लोकसंख्या आज युवा वर्ग म्हणून समोर येत आहे. १२० करोड मधील निम्म्याहून जास्त लोकसंख्या ही ३० वर्षांची आहे. हि लोकसंख्या कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्वाची आहे. आपल्या नंतर थेट क्रमांक लागतो तो म्हणजे चीनचा आणि त्यांची सरासरी आहे ४६ वर्षं वयाची. आज आपण पाहतो १०-१२ वी शिक्षण झालेली मुले-मुली मॉलमध्ये आपले शिक्षण करत करत काम करत आहेत आणि त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर एक ग्राहक म्हणून बाजारात वावरत आहेत त्यामुळे एक मोठी बाजारपेठ म्हणून हिंदुस्थानी बाजाराकडे पहिले जात आहे.

२. महिला वर्ग :- २००१ च्या सर्वेक्षणानुसार हिंदुस्थानामध्ये ४% महिला नोकरी -धंद्यामध्ये कार्यरत होत्या २०१४ च्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण १४% आहे आणि येत्या काळात हे प्रमाण २५% च्या वर जाईल. आतपर्यंत महिला ना ग्राहक पेठेत मोठे स्थान नव्हते पण स्वतःकडे आलेल्या उत्पन्नाच्या जोरावर त्याही बाजारात स्वतःच्या मर्जीनुसार खरेदी करत आहेत .

३. ग्रामीण वर्ग :- हिंदुस्थानातील अजूनसुद्धा निम्मी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. गेल्या १० वर्षांत रिअल इस्टेटचे वाढलेले दर, ग्रामीण भागातील राहणीमानाचा उंचावलेला स्तर, डिजिटल क्रांतीमुळे घराघरात पोहचलेले स्मार्टफोन आणि इंटरनेट त्यामुळे ग्रामीण वर्ग ही आज मोठ-मोठ्या कंपनीच्या रडारवर आहे जो आतापर्यंत दुर्लक्षित होता.

या वरील तिन्ही घटकांचा एकत्रितपणे परिणाम हिंदुस्थानातील उद्योग-धंद्यावर होतोय आणि ज्या कंपन्या या ग्राहकाच्या गरजा ओळखून आपल्या सेवा आणि उत्पादने त्यांना पुरवत आहेत. त्या नक्कीच चांगल्या नफ्यामध्ये आहेत. जर आज आपण हिंदुस्थानी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणार आहोत तर आपल्याला अशा कंपन्या शोधाव्या लागतील ज्या ग्राहकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवत आहेतच, पण त्याच बरोबर जबरदस्त नफा आपल्या शेअर होल्डर्सना सुद्धा करून देत आहेत. पुढील लेखात अशा कंपन्या कशा निवडाव्या ते पाहूया. आणि काही कंपन्यांची उदाहरणेही पाहूया. पुढील १०-१५-२० वर्ष हिंदुस्थानाची आहेत. त्यामुळे अभ्यास करा संपत्ती नक्कीच तुम्ही कमवाल.

आपली प्रतिक्रिया द्या