पैशांचा पाऊस भाग ४६- ग्राहक की मालक… निर्णय तुमचाच…

mumbai share market

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

सध्याच युग हे शेअर बाजाराचं आहे असं वर-वर आपण म्हणत असलो तरी जेव्हा शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक गुंतवणूकदार हा गोंधळलेला असतो. आज शेअर बाजार गुंतवणुकीवर एक ना अनेक पुस्तके, वर्तमानपत्रातील लेख, CNBC आवाज, ZEE Business यासारखे टी. व्ही. चॅनेल आणि त्याचबरोबर इंटरनेटसारखी माध्यमे उपलब्ध असतानाही गुंतवणूकदार यशाचा फॉर्म्युला शोधत असतो.

या शतकातील असामान्य गुंतवणूकदार म्हणून ज्या वॉरेन बफेट यांच्याकडे आदराने पहिले जाते, त्यांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीसाठी नेहमी अशा कंपन्या निवडल्या, ज्या वस्तू / सेवा ज्याची आपल्याला दैनंदिन गरज पडते. या वस्तू / सेवा मागील कंपनीचा जर आपण अभ्यास करून योग्य गुंतवणूक केली तर गुंतवणूक गुरु वॉरेन बफेट प्रमाणेच सामान्य गुंतवणूकदारही असामान्य नफा पदरात पडून घेऊ शकतो.

भारत एक आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय यात सर्वात मोठा वाटा आपल्या बदललेल्या मानसिकतेमध्ये आहे. कमवलेल्या पैशामधून बचत बाजूला करून मग खर्च करण्याची आपली मानसिकता, आता पहिला खर्च आणि मग बचत याकडे वळतेय आणि याचमुळे आपली अर्थव्यवस्था “Saving economy” मधून “spending economy”मध्ये रुपांतरीत झाली आहे. आपल्या उंचावलेल्या राहणीमानामुळे काही वस्तू / सेवा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसल्या आहेत की त्यांच्या शिवाय जगणेच अशक्य वाटू लागते किंवा कमीपणाचे वाटू लागले आहे.

भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना कंपनी निवडण्याकरता त्यातल्या त्यात सोपा गुंतवणुकीचा मार्ग म्हणजेच “BUY STOCKS NOT JUST PRODUCT” याचा आपण मागोवा घेणार आहोत

१) Asian Paints : भारतातील पेंट व्यवसायातील अग्रगण्य कंपनी. आधी घरामध्ये काही लग्नकार्य असेल तरच घरातील भिंतींना रंग-रंगोटी केली जायची. पण आता राहणीमानात झालेल्या बदलामुळे प्रत्येकजण आपल्या घराच्या इंटिरियरबद्दल सजग झाला आहे. गेल्या १० वर्षापासून २०-२५% चा परतावा या कंपनीने दिला आहे. आपण घरात पेंट करायचा विचार करतो तेव्हा आपसूकच आपण एशियन पेन्ट्स चा विचार करतो, हो ना ? पण या कंपनीचा शेअर्स खरेदी करायचा विचार कधी डोक्यात आला का? नाही ना?

• आपण 1999 मध्ये रंगकामावरील झालेल्या खर्चासोबतच काही पैसा जर ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवला असता, तर आपल्या गुंतवणूक मूल्याची आता 48 वेळा वाढ झाली असती. रंगकामावरील खर्च Rs.50,000 = Rs.23.98 लाख आजचे शेअर्सचे मूल्य.

२) Sun Pharma : Sun Pharma सारख्या अग्रगण्य औषध कंपनीची औषधावर केलेली ३०० रुपयांची खरेदी जर तेवढीच गुंतवणूक त्या कंपनीचे शेअर घेण्यासाठी केली असती तर ती २१८२% म्हणजेच २१ पट झाली असती.

• औषधावरील खर्च Rs. ३०० = Rs. ६४१४७ आजचे शेअर्सचे मूल्य.

३) Mahindra & Mahindra :- भारतातील प्रत्येक सधन व्यक्ती आज चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. २००० सालानंतर वाढलेल्या उत्त्पन्न च्या जोरावर खूप जणांनी हे स्वप्न पूर्ण हे केले. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ या SUV गाडीला मारुती ८०० सारखे पदार्पणातच यश मिळाले. मोठ्या परिवाराला ही गाडी आपल्या दारात असावी असे वाटू लागले आणि स्कॉर्पिओच्या विक्री ने महिंद्राच्या शेअर्सला उच्चांकी पातळीवर नेले.

• जर आपण २००१ मध्ये एक ७.५ लाखांची Mahindra & Mahindra ची गाडी खरेदी केली असती आणि त्याच किंमतीचे शेअर खरेदी केले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीची किंमत ५.६ करोड इतकी झाली असती – एक आलिशान गाडी घेण्याइतपत.

४) Colgate – Palmolive :- “एक कोलगेट द्या ना” आणि पेप्सोडेन्ट नीट बघून घेऊन पैसे देणारे लोक पहिले आहेत का ? हो ना ? कारण कोलगेट सारखे काही ब्रँड प्रॉडक्टच्याही पुढे जाऊन घरा-घरात लोकांच्या मनात स्थान निर्माण करतात. कोलगेट पावडर पासून आज जवळपास ३६ वेगवेगळे प्रॉडक्ट घेऊन उभी असलेली कंपनी. कधी विचार केलात का कंपनीला किती नफा होत असेल ?

• एक कोलगेट टूथपेस्ट खरेदी करण्यासाठी लागणारे तेव्हा लागणारे ३० रुपये तेवढेच पैसे जर आपण कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली असती तर आपला पैसा आता 13 पट किंवा 1201%, वाढला असता. टूथपेस्टवरील खर्च रु. 30 = Rs.390 आजचे शेअर्सचे मूल्य.

५) Hero MotoCorp : तारुण्यात पदार्पण करणाऱ्या प्रत्येक मुलाला वाटते की माझ्याकडे एक दोन चाकी असावी आणि हिरो मोटोकॉर्प सारख्या कंपनीची असेल तर क्या कहना ? हो ना ? Hero MotoCorp या कंपनीची हिरो होंडा सीडी – 100 मोटरसायकल भारतातील शहर गावामध्ये लोकप्रिय झाली होती. जवळपास ३०००० रुपयाला असणारी ही दुचाकी तरुणांसाठी एक आकर्षण होती. एखाद्याने या दुचाकीची विक्री पाहता काही पैसे हिरो मोटोकॉर्पच्या स्टॉकमध्ये गुंतवले असये तर ते पैसे १००००% ने वाढले असते.

• मोटरसायकलची किंमत रु. 30,000= रु. 31,82 लाख आजचे शेअर्सचे मूल्य.

६) BPCL : भारतातील पेट्रोल- डिझेल पुरवणारी कंपनी. १९९९ मध्ये भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर ५०० रुपयाचे पेट्रोल भरले असेल आणि तेवढीच रक्कम जर BPCL च्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर आजचं त्याचं मूल्य ५००० रुपये असत. आजच्या पेट्रोल च्या कीमतीनुसार ३-४ वेळा पेट्रोल भरण्याइतपत.

७) Indian Hotels : आपण सुट्टीत Indian Hotels ह्या कंपनी द्वारे चालवण्यात येणाऱ्या Hotels मध्ये राहण्याचा आनंद घेतला असेलच ना…. ? हा आनंद घेताना आपण जर आपण त्याच किंमतेचे कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते तर आपली गुंतवणूक ५.५ पटीने किंवा ४५८% ने वाढली असती.
• Hotels एका रात्रीचे राहण्याचा खर्च Rs.3000 = Rs. 16725 आजचे शेअर्सचे मूल्य.

८) Crompton Greaves : काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक फिटिंग्जसाठी लागणारे २५०० रुपये जर आपण कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले असते तर आज आपली गुंतवणूक ७६ पटीने वाढली असती.

• इलेक्ट्रिक फिटिंगसाठी लागणारे २५०० रुपये = Rs. 1.91 लाख आजचे शेअर्सचे मूल्य.

तुम्ही म्हणाल वरील उदाहरणे ही भूतकाळातील आहेत आता पुढे काय ते सांगा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. दिवसेंदिवस लोकांचे राहणीमानाचा दर्जा उंचावतच जाणार आणि अशा जागतिक दर्जाच्या कंपन्या किंवा त्यांच्या सेवा/वस्तू आपल्या घरात येणारच. तुम्हाला फक्त हेच पाहायचे आहे की लोक कुठे वेडयासारखा पैसे खर्च करत आहेत. त्या कंपनीचा अभ्यास करायला घ्या. वॉरेन बफेट यांनी गेली ६० वर्ष कोका-कोला कंपनीचे शेअर्स खरेदी करून ठेववले आहेत आणि आपण कोका कोलाच्या बाटल्या फस्त करण्यात आघाडीवर आहोत. चला चालू करा शोध अशा वेगवेगळ्या कंपनीचा ज्यांचे प्रॉडक्ट आपण गेले काही वर्ष वापरतोय
• Britannia
• Nestle India
• Gillette
• Maruti Suzuki
• HUL
• Titan
• TVS Motors
• Page Industries ( Jockey Innerware)
• Eicher Motors (Royal Enfield)
• Fevicol ( Pidilite Industries)

२१ व्या शतकामध्ये आपल्या राहणीमानामध्ये झालेला बदल आणि त्यामुळे ग्राहक होऊन स्वतःचा खिसा कमी करायचा की या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून मालक बनायचे आणि नफा पदरात पडून घ्यायचा हा निर्णय तुमच्यावरच…… !!!

आपली प्रतिक्रिया द्या