
तब्बल सहा वेळा आमदारकी, कॅबिनेट मंत्रिपद देऊनही गद्दारी करणारे ‘ईकासपुरुष’ आमदार संदिपान भुमरे हे पैठणकरांच्या नजरेतून पार उतरले आहेत! ज्या पैठणकरांनी आपल्याला डोक्यावर घेतले, विजयाचा गुलाल आपल्यावर उधळला त्यांना सामोरे कसे जायचे म्हणून गद्दारी केल्यापासून आमदार भुमरे हे पैठणला फिरकलेच नाहीत.
संत एकनाथ साखर कारखान्यावर ‘स्लीप बॉय’ म्हणून किरकोळ पगारावर नोकरी करणाऱ्या संदिपान भुमरे यांना शिवसेनेने अक्षरश: भरभरून दिले. सुरुवातीला कारखाना संचालक, पंचायत समितीचे सदस्य व उपसभापती असा त्यांचा राजकीय विकास झाला. 1995 मध्ये केवळ आणि केवळ शिवसेना या चार अक्षरी मंत्रामुळे पैठणकरांनी त्यांना आमदार केले. त्यानंतर पाच वेळा धनुष्यबाण निशाणीवरच भुमरे आमदार झाले. जिल्हा बँक, नगर परिषद, मार्केट कमिटी, जिल्हा दूधसंघ व शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ आदी संस्थांवर फडकलेल्या भगव्या झेंड्याखाली त्यांना अमर्याद सत्तेची चव चाखायला मिळाली. एवढेच नव्हे तर मुलगा विलास भुमरे यांनाही जिल्हा परिषद सभापती म्हणून मानपान मिळाला. बंधू राजू भुमरे हे केवळ शिवसेनेमुळे तालुका कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती होऊ शकले. तसेच पुतणे शिवराज राजू भुमरे यांना तरुण वयातच पाचोड या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळाले. सामान्य शिवसैनिकाला बाजूला ठेवून सत्तेची सगळी पदे भुमरे यांनी आपल्या घरातच ठेवली. शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कमालीची निष्ठा असणाऱ्या पैठणच्या शिवसैनिकांनी हा अन्यायही सहन केला. संदिपान भुमरे यांनी निष्ठावंत परंतु त्यांच्यासाठी ‘डोईजड’ ठरणाऱ्या अनेकांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मजबूर केले. एवढी सर्व एकहाती सत्ता व संघटनेअंतर्गत अधिकार असताना त्यांनी फाटक्या शिवसैनिकांची झोळी अधिकच फाटकी केली. गेल्या 3 वर्षापासून तर उपरे व्यासपीठावर तर शिवसैनिक सतरंजीवर, असे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. परंतु ही खदखद कधी बाहेर आली नाही. एवढे सगळे सत्तावैभव देऊनही संदिपान भुमरे यांना गद्दारीची अवदसा आठवली. संदिपान भुमरे यांच्या गद्दारीबद्दल पैठणकरांमध्ये संताप आहे, रोष आहे.
महिनाभरापासून पैठणकडे पाठ
आमदार संदिपान भुमरे हे महिनाभरापासून पैठण मतदारसंघात फिरकलेच नाहीत. देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी नाथमहाराजांच्या दर्शनासाठी भुमरे आले. पण जेथे सोने वेचले तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ त्यांच्यावर आली. शिवसैनिकच काय पण सर्वसामान्य पैठणकरांनी त्यांना साधी ओळखही दाखवली नाही. पैठणकरांच्या नजरेला नजर न भिडवता खालमानेने आल्यापावली परत जाण्याची वेळ भुमरेंवर आली. त्यानंतर ते अद्यापही मतदारसंघात दिसलेले नाहीत.

































































