मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला, मदतीचा खडकूही आला नाही; ऐन दिवाळीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेली पिके मातीसह वाहून गेली. त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर. दिवाळीला मदत मिळणारच, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने त्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. पण सरकारकडून खडकूही न आल्याने सण कसा साजरा करायचा? बायकोला नवी साडी. जगायचे कसे ? अशा प्रश्नांनी हतबल झालेल्या पैठण तालुक्यातील खादगाव आणि तुपेवाडी येथील दोन शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत जगाचा निरोप घेतला. एकाने गळफास, तर दुसऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली.

शहरी भागातील आतषबाजीचा दणदणाट आणि लख्ख दिव्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बळीराजाच्या झोपड्यांमध्ये मात्र निःशब्द हुंदके ऐकायला आले. पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. या ‘अस्मानी’ संकटानंतर जलसंपदा विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे महापुराची ‘सुलतानी’ आली. तब्बल ९२ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. अडीच लाख एकर क्षेत्रावरील जिरायती तसेच बागायती पिके भुईसपाट झाली. काही मंत्र्यांनी बांधांवरुन तर काहींनी ट्रॅक्टरवर बसून पाहणी करत फोटोबाजी केली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिवाळीच्या अगोदर मदत देऊ !’ असा शब्द दिला. त्यामुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांना किमान सण तरी साजरा करता येईल, असा दिलासा मिळाला.

पाडव्याच्या रात्री घेतला गळफास

दिवाळी आली, पण सरकारची मदत काही मिळाली नाही. लक्ष्मीपूजनाला घरच्या लक्ष्मीला नवीन साडी खरेदी करता आली नाही. पहिल्यांदाच लेकरं फटाक्यांविना घरात बसलेली. अशा विषण्ण परिस्थितीत खादगाव (ता. पैठण) येथील शेतकरी रामनाथ विश्वनाथ तानवडे यांनी पाडव्याच्या रात्री २२ रोजी शेतातच गळफास घेतला. सकाळी मुलगा केशव तानवडे शेतात गेला तेव्हा वडील झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसले. अतिवृष्टीत त्यांचे गट क्रमांक २२० मधील डाळींब, कांदा, कपाशी व तुरीचे पीक भुईसपाट झाले.

दीपावलीच्या पूर्वसंध्येला घेतला जगाचा निरोप

दीपावलीच्या पूर्वसंध्येला १९ रोजी तुपेवाडी येथील नामदेव लालसिंग राठोड या शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या गट क्रमांक ७४ मध्ये अवघी २ एकर शेतजमीन आहे. त्यावरच ते कुटुंबाची गुजराण करतात. अतिवृष्टीत पिकांची हानी, बँकांचे कर्ज, येऊन ठेपलेली दिवाळी अन् पदरात न पडलेली सरकारची नुकसान भरपाई. यामुळे व्यथित होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. विषारी औषध पिऊन त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, तहसीलदार ज्योती पवार यांनी आदेश दिल्यानुसार महसूल प्रशासनाच्या वतीने या दोन्ही प्रकरणांचे पंचनामे करण्यात आले. तलाठी वाबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.