पैठणच्या बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैठण तालुक्यातील 80 पैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असुन रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या पाचोड गावातील ग्रामपंचायतचे शिवसेनेचे सर्वचे सर्व 17 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

नाथसागरच्या पायथ्याशी असलेल्या नियोजित संतपीठ ईमारतीत आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. महसूलचे उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके व निवडणूक विभाग प्रमुख जनार्दन दराडे यांनी 12 फेऱ्यात ही प्रक्रिया दुपारी 11.30 वाजता पूर्ण केली. यात 90 टक्के ग्रामपंचायती शिवसेनेच्या अधिपत्याखाली आल्या.

विशेषतः लिंबगाव, विहामांडवा, रांजणगाव, आखतवाडा, आवडे-ऊंचेगाव, नवगाव, टाकळी-अंबड, चांगतपुरी, तांदुळवाडी, पिंपळवाडी (पिराची), कावसान (जुने), कुतुबखेडा-कौंदर, घारेगाव, कडेठाण, पाटेगाव, आनंदपुर व म्हारोळा येथे शिवसेनेच्या पँनलने एकहाती बाजी मारली.

मतमोजणी करताना पाचोड ग्रामपंचायतचा निकाल अखेरीस लागला. रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांचे गाव असलेल्या या ग्रामपंचायतवर 1989 पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. विशेष म्हणजे विरोधकांची एकही जागा येथे निवडून येत नाही.

या निवडणुकीतही विरोधक चारीमुंड्या चित झाले. 3 जागा बिनविरोध झाल्या. 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भुमरे, शिवराज भुमरे व भास्कर दळवी यांच्यासह शिवसेनेचे सर्व 14 उमेदवार मोठ्या मतसंख्येने विजयी झाले आहेत.