येरवडय़ातील कैद्यांच्या पैठणीला मोठी मागणी,10 ते 30 हजारांपर्यंत किंमत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलईन, मुंबई

मनासारखी डिझाईन आणि बारीक नक्षीकामामुळे येरवडा मध्यवर्ती कारागृहात तयार केल्या जाणाऱ्या पैठणीला आता सहा महिन्यांची वेटिंग लिस्ट आहे. पैठणीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे कैद्यांच्या हाताला रोजगार मिळून त्यांना अच्छे दिन आले आहेत. पैठणीच्या निर्मितीकरिता संभाजीनगर, नाशिकप्रमाणे यापुढे येरवडा मध्यवर्ती कारागृहाचेच नाव घेतले जाणार आहे.

तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत राज्यात 9 मध्यवर्तीसह 172 उपकारागृहे आहेत. कारागृहात कैद्यांच्या पुनर्वसनावर भर दिला जातो. कैद्यांना तुरुंगात विविध बहुपयोगी प्रशिक्षण देऊन त्यांना पुन्हा समाजाच्या प्रवाहात आणण्यात येते. उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी नाशिकच्या तुरुंगात कैद्यांना पैठणीचे प्रशिक्षण दिल्यानंतर कैद्यांनी एक साडी तयार केली. ती साडी विक्रीकरिता ठेवण्यात आली होती. त्या साडीला मिळालेला प्रतिसाद पाहून येरवडा मध्यवर्ती कारागृहात पैठणी बनवण्याचे ठरले. ऑगस्ट 2016 मध्ये पैठणी साडीनिर्मितीच्या कामाला सुरुवात झाली. पैठणीच्या निर्मितीकरिता कारागृहातील 20 कैद्यांची निवड करण्यात येऊन त्यांना पैठणीचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण दिल्यानंतर कैदी पैठणी बनवू लागले आहेत. दिवाळी सणामध्ये त्या साडय़ा प्रदर्शनात ठेवल्या होत्या तेव्हा अनेकांनी त्या साडय़ांबाबत तुरुंग प्रशासनाकडे चौकशी केली होती. नुकतेच तुरुंगात हातमागावरील साडय़ांच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून त्याकरिता दोन कैद्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी तुरुंगात पाहणी केली असता त्यांना हातमागावरील साडय़ांची भुरळ पडली होती. तुरुंगातील पैठणी साडय़ांना चांगला प्रतिसाद आहे. सध्या सहा महिन्यांची वेटिंग लिस्ट आहे, अशी माहिता अधीक्षक उमाजी पवार यांनी दिली.

रंग-नक्षीकामात अव्वल

येरवडय़ातील पैठणीला सहा महिन्यांची वेटिंग लिस्ट आहे. मनासारखी डिझाईन, रंग आणि नक्षी कामामुळे पैठणीला मागणी आहे. नक्षीकामामुळे एक पैठणी तयार करण्यास साधारण दोन ते तीन महिने इतका कालावधी जातो. साधारण 10 हजार ते 30 हजार रुपये अशी त्या पैठणीची किंमत आहे. साडी विक्रीतून मिळालेल्या पैशातील काही रक्कम ही कैद्यांना दिली जाते.